शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून प्रेमसंबंधातून
By Admin | Updated: July 15, 2017 00:05 IST2017-07-15T00:05:31+5:302017-07-15T00:05:31+5:30
शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून प्रेमसंबंधातून

शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून प्रेमसंबंधातून
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शिरोळचा पोलीसपुत्र असलेल्या शब्बीर बोजगर याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी याप्रकरणी सांगलीतील संशयित पिता-पुत्रासह तिघांना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रोहित रवींद्र नगरकर (वय २८), रवींद्र जीवन नगरकर (५५) व आकाश जफान माच्छरे (२५, तिघे रा. श्यामनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना निपाणी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बोजगरचा हणबरवाडी-कर्नाटक येथे ११ जुलैला निर्घृण खून झाला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार (एमएच ०१ एएच ६४५८) व (एमएच १० बीए ५३२२) अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शब्बीर बोजगर यांचा मुलगा शाहरुख याच्या खून प्रकरणाचा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. पथकाला मिळालेल्या माहितीवरून वरील तिघा संशयितांना अटक केली. याबाबत निपाणी पोलिसांना कळवून संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी संशयित आरोपींचे नातेवाईक ताबा देण्यास विरोध करीत असल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढत निपाणी पोलिस संशयितांना घेऊन गेले. दरम्यान, शाहरुख याचे सांगलीतील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांनंतर शाहरुखला संबंधित युवतीचा पूर्वी विवाह झाला असल्याचे समजले. त्यामुळे दोघांच्यात वादावादीचे प्रसंग घडले होते. त्यानंतर युवतीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. हा राग मनात धरून युवतीचे वडील व भाऊ यांनी शाहरूखचा गेम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ते शाहरुखच्या मागावर होते. ११ जुलैला तिघांनी शाहरुखचा काटा काढला. त्याचे शिवाजी विद्यापीठामधून अपहरण केले. त्याला हणबरवाडी परिसरात नेऊन तेथे त्याचा खून केला, असे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती पथकाचे प्रमुख शहाजी निकम यांनी दिली.
आणखीन काहीजणांचा समावेश?
घटनेची तीव्रता व घटनास्थळावरील परिस्थिती, तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन कार हस्तगत केल्याने यामध्ये आणखीन काहीजणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
सुशिक्षित कुटुंबाकडून रागातून कृत्य
या प्रकरणातील संशयित नगरकर कुटुंबीय हे सुशिक्षित आहेत. सुमित व रोहित दोघे उच्चशिक्षित, तर वडील सुशिक्षित आहेत. तसेच त्यांची मृत बहीणही उच्चशिक्षित होती; पण बहिणीच्या मृत्यूमुळे रागाच्या भरात हे कृत्य घडले.
फेक अकाऊंट काढून शाहरुखला ओढले जाळ्यात
गेल्या तीन महिन्यांपासून संशयितांपैकी एकाने सोशल मीडियावर फेक (बनावट) अकाऊंट काढून त्या माध्यमातून तो शाहरुख याच्याशी चॅटिंग करीत होता. त्यातून त्यांचे मैत्रीचे संबंध वाढून त्याला हणबरवाडी परिसरात बोलावून घेऊन
त्याचा गेम केल्याची माहितीही तपासात पुढे येत आहे.
एकाच कुटुंबातील
तिघे ताब्यात
या खून प्रकरणात वडिलांसह दोन मुले व एक मुलाचा मित्र असे चौघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. निपाणी पोलिसांनी सुमित नगरकर याला गुरुवारी (दि. १३) ताब्यात घेतले आहे. तर त्याचा भाऊ रोहित, वडील रवींद्र नगरकर व मित्र आकाश माच्छरे या तिघांना इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले.