सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरू होणार: अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:38+5:302021-06-21T04:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/कोल्हापूर : गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी छत्रपती शाहू ...

सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरू होणार: अजित पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/कोल्हापूर : गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला आवश्यक निधी देण्यासह स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये व कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. सारथीला एक हजार कोटींच्या निधीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीतील निर्णयांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत पुण्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या उपकेंद्रासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात पवार यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या बैठकीत निर्देश दिले.राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल.
सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत त्यांना मान्यता घेऊन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.
‘सारथी’ लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख असून त्यात एक लाखाच्या आत, तीन लाखांच्या आत, तीन ते पाच लाखांच्या आत व पाच ते आठ लाखांच्या आत असे टप्पे तयार केले आहेत. अभ्यासक्रमनिहाय ‘सारथी’कडून दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येणार आहे. ‘सारथी’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाची छपाई करून त्याचे तत्काळ वितरण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. यासह सारथीला एक हजार कोटींच्या निधीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, संजीव भोर, अंकुश कदम, विनोद साबळे, राजेंद्र कुंजीर, सचिन अडेकर, महादेव तळेकर, रघुनाथ चित्रे पाटील व अन्य समन्वयक उपस्थित होते.
फोटो : १९०६२०२१-कोल-सारथी
ओळी : मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल घेऊन सारथी संस्थेविषयी शनिवारी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार संभाजीराजे यांच्यात बैठक झाली.