सारस्वत बँकेची सभा होऊ देणार नाही

By Admin | Updated: July 29, 2014 23:06 IST2014-07-29T19:57:00+5:302014-07-29T23:06:56+5:30

प्रलंबित मागण्यांसाठी मराठा बँक कर्मचाऱ्यांचा इशारा

Saraswat Bank will not hold a meeting | सारस्वत बँकेची सभा होऊ देणार नाही

सारस्वत बँकेची सभा होऊ देणार नाही

कसबा बावडा : सारस्वत बँकेने मराठा बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर न सोडविल्यास बँकेची आगामी सर्वसाधारण सभा होऊ देणार नाही, असा इशारा मराठा बँक अन्याय निवारण समितीच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवनाच्या मिनी हॉलमध्ये झालेल्या बैठकीत दिला.
सारस्वत बँकेने मराठा बँक कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाईची तुटपुंजी रक्कम देऊन नोकरीवरून कमी केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अन्याय निवारण समिती स्थापन करून सारस्वत बँकेविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला या लढ्याला संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड, आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
छावा संघटनेचे राजू सावंत म्हणाले, मराठा बँक कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता छावा संघटनेचा झाला आहे. सारस्वतने मराठा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कमी केले. केवळ एका कर्मचाऱ्याला तेवढे कामावर ठेवले आहे. तो कर्मचारीसुद्धा त्यांच्या मर्जीतला आहे म्हणून. त्यामुळे मराठा बँक कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता आम्ही आमच्या स्टाईलने सोडवू.
संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे पाटील म्हणाले, संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत जी आंदोलने केली ती पूर्ण केली आहेत. सारस्वतने मराठा बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे सारस्वत बँकेला धडा शिकवावाच लागेल. येत्या गुरुवारी शिवाजी पुतळा येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाईल.
बाबूराव रणदिवे यांनी प्रास्ताविक करून या सुरू असलेल्या लढ्याची दिशा स्पष्ट केली. यावेळी संजय साळोखे, उदय माने, अनिल वरुटे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टोलेजंग इमारती काढल्या विक्रीस
मराठा बँकेच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील भव्य इमारती आता सारस्वत बँकेने विक्रीस काढल्या आहेत. पाच वर्षे होऊनही बँकेच्या चाळीस हजार सभासदांना त्यांचे शेअर्सचे पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे हे प्रश्न आता संघटनेचे झाले आहेत, असे हिंदुराव हुजरे पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Saraswat Bank will not hold a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.