नीलम गोऱ्हेंसमोरच शिवसैनिकास चोपले
By Admin | Updated: January 11, 2016 01:11 IST2016-01-11T01:11:14+5:302016-01-11T01:11:32+5:30
बंदोडेंसह तिघांवर गुन्हा : वाद उफाळला

नीलम गोऱ्हेंसमोरच शिवसैनिकास चोपले
कोल्हापूर : कोल्हापूर शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी पुन्हा उफाळून आला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे दुपारी साडेचार वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. यावेळी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या विरोधात काम करतोस असे म्हणून रणजित सर्जेराव आयरेकर (वय ३७, रा. आयरेकर गल्ली, रंकाळा स्टँड, कोल्हापूर) यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराने मंदिराच्या आतील भागात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. आमदार गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून आयरेकर यांची सुटका केली.
याप्रकरणी आयरेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय साहायक राहुल बंदोडे, कार्यकर्ते सुनील जाधव व उमेश रेळेकर यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे (शिवीगाळ व मारहाण) गुन्हा दाखल केला.
दुपारी साडेचारच्या सुमारास नीलम गोऱ्हे या अंबाबाई दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रणजित आयरेकर हेही या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, राहुल बंदोडे, सुनील जाधव, उमेश रेळेकर यांनी आयरेकर यांना तू आमच्या नेत्याच्या विरोधात काम करतोस, असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रविवार असल्याने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. थेट मंदिरातच मारहाणीचा प्रकार पाहून भाविक भीतीने सैरावैरा पळत सुटले. आमदार गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून आयरेकर यांची सुटका केली. त्यानंतर आयरेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
अंबाबाई मंदिरातील प्रकार हा वैयक्तिक वादातून झालेला आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.
- संजय पवार,
शिवसेना जिल्हाप्रमुख