भुदरगड तालुक्यात रोप लागणीचे काम १०० टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:09+5:302021-07-22T04:17:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : भुदरगड तालुक्यात पूर्वेला भात पिकाची टोकण तर पश्चिम भागातील भात रोप लागणीचे काम १०० ...

भुदरगड तालुक्यात रोप लागणीचे काम १०० टक्के पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यात पूर्वेला भात पिकाची टोकण तर पश्चिम भागातील भात रोप लागणीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने माळरानातील रोप लागण पूर्ण झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात भात पीक टोकण पद्धतीने केले जाते तर पश्चिम भागात रोप लागण केली जाते. टोकण केलेल्या ठिकाणी मध्यंतरी पावसाने ओढ दिलेल्या कालावधीत बाळ कोळपणी झाल्या आहेत. पाऊस सुरू झाल्याने सध्या चिखल कोळपणी सुरु आहेत. पावसाने ओढ दिल्याने भात पिकावर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने कडगाव-पाटगाव परिसरासह पश्चिम भागातील रोप लागणीचे काम खोळंबले होते. पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर रोप लागणीच्या कामांना कमालीचा वेग आला. अपुऱ्या पावसामुळे माळरानावरची रोपे खोळंबली होती. भात तरव्यांना वाफसा येऊनदेखील पावसाच्या उघडिपीमुळे माळरानावरच्या शेतात पाणी उपलब्ध होत नव्हते. नाचणी, भुईमूग लागण झाली आहे.
पावसाने ओढ दिलेल्या कालावधीपासून ऊसावर लोकरी माव्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दमट वातावारण लोकरी माव्याच्या प्रादुर्भावाला पोषक ठरत आहे. लोकरी माव्यामुळे ऊस पिकाची वाढ खुंटली आहे तर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऊसाची पाने पिवळी पडू लागली आहेत. ९०५७ व ३१०२ ऊस बियाणे वगळता इतर ऊसावर करपा व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
गारगोटी : देवर्डे येथे चारसुत्री पद्धतीने शेतकऱ्यानी रोप लागण केली.