आॅनलाईन प्रश्नमंजूषेत संतोष विजेता
By Admin | Updated: October 16, 2015 23:23 IST2015-10-16T23:19:25+5:302015-10-16T23:23:35+5:30
व्हॉट्स अॅपवर पहिलीच स्पर्धा : प्रिया पावसकर उपविजेती; देशातील पहिली स्पर्धा

आॅनलाईन प्रश्नमंजूषेत संतोष विजेता
कोल्हापूर : व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सायन्स ते टेक्नॉलॉजी विषयावरील ‘कलाम ते बच्चन’ या देशातील पहिल्याच आॅनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत संतोष पाटील यांनी विजेतेपद, तर प्रिया पावसकर यांनी उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेत एकूण चार फेऱ्या झाल्या. त्यामध्ये अनुक्रमे ४८, २४, १२ आणि ६ विजेते घोषित करण्यात आले.
अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणि दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त या प्रश्नमंजूषेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी १०० स्पर्धक पात्र ठरले. त्यांना क्वीज मास्टर विजय राऊत यांनी बेळगावहून प्रश्न विचारले. अशा पद्धतीने पहिल्यांदाच स्पर्धा होत स्पर्धकांसह असल्याने व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सदस्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
स्पर्धेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे , मुंबई, सोलापूर, बीड, लातूर, ठाणे, नवी मुंबई आणि बेळगाव भागातून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तरुणाईसह व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, सरकारी अधिकारीही सहभागी झाले होते, तर १३ वर्षांच्या एक विद्यार्थ्यानेही भाग घेतला होता. स्पर्धकांमध्ये ३0 टक्के महिला होत्या.
कलाम हे सायन्सचे बादशहा, तर बच्चन हे टेक्नॉलॉजी वापरातील शहनशहा होते. प्रश्नमंजूषेचे अभ्यास साहित्य क्वीज मास्टर विजय राऊत यांनी तयार केले. त्याना कुवेत येथील अनिस काझी आणि शिराळा येथील विश्वनाथ पवार यांनी सहाय्य केले. हे साहित्य बच्चन वेडे कोल्हापुरी
ग्रुपचे सदस्य संताजी पाटील यांनी तयार केलेल्या कलाम ते बच्चन क्वीज या व्हॉट्स अॅपअर शेअर केले.
या स्पर्धेची अंतिम फेरी एका हॉटेलमध्ये पार पडली. ग्रुपतर्फे आयोजित बच्चन बर्थ डे पार्टी दरम्यान झालेली ही अंतिम फेरीही आॅनलाईनच झाली. या फेरीत पोहोचलेल्या सहापैकी तीन स्पर्धक प्रत्यक्ष उपस्थित होते. तीन सदस्य परगावी असल्यामुळे आॅनलाईन उपस्थित राहिले, तर क्वीज मास्टर विजय राऊत हे बेळगावहुन आॅनलाईन होते. या स्पर्धेतील इतर चार अंतिम विजेत्यांमध्ये सुशांत बाईत (तृतीय), सचिन पाटील (चतुर्थ), पराग जोशी (पाचवा), आशिष शर्मा (सहावा) यांचा समावेश आहे.
विजेत्यांना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते तसेच फायटो फार्माचे गुणे यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली. क्रमांक चार, पाच आणि सहाच्या विजेत्यांना अॅडफाईनचे अमरदीप पाटील, अॅडव्होकेट इंद्रजित चव्हाण आणि सचिन लिंग्रज यांच्या हस्ते चषक, भेटवस्तू व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. ग्रुप अॅड्मीन सुधर्म वाझे यांनी सूत्रसंचालन केले.