कोल्हापूर जिल्ह्यात संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:49 IST2016-07-10T01:22:39+5:302016-07-10T01:49:54+5:30
शहराला तळ्याचे स्वरूप : इंदुमती गर्ल्स हायस्कूलची भिंत कोसळली; धरण क्षेत्रात धुवाधार

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस राहिला. सकाळी दहा वाजल्यापासून पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शहराला तळ्याचे स्वरूप आले होते. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून, अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले. इंदुमती गर्ल्स हायस्कूलची भिंत कोसळून सुमारे बारा दुचाकी त्याखाली गाडल्या गेल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. पण शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर हळूहळू वाढत गेला. सकाळी दहानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू राहिला. दुपारनंतर पावसाचा जोर कमालीचा वाढला. एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले, तर अनेक ठिकाणी काहींच्या घरांत पाणी गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
देवकर पाणंद परिसरातील सुश्रृषानगर, राजलक्ष्मीनगर यासह संभाजीनगर, कळंबा कारागृह व तपोवन परिसरातील काही घरांत रस्त्यावरील पाण्याचे लोट घरात शिरले. गुरुप्रसादनगर, गणेश कॉलनी, आयटीआयच्या पिछाडीस असणाऱ्या चार ते पाच तर सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ, उचगाव येथील सात ते आठ घरांत पाणी शिरले. अचानक पावसाचा जोर वाढल्याने नागरिक (पान ७ वर)
शहरात घबराट
गेले महिनाभर जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी शनिवारी वरुणराजाने रौद्ररूप धारण केले होते. अचानक धुवाधार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांचे तळे झाले होते. त्यात शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने एक प्रकारची घबराट पसरली होती.
चोवीस तासांत तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये असा-
करवीर - ५.६३, कागल - ७.२१, पन्हाळा - ५.७१, शाहूवाडी - १७, हातकणंगले - १.६२, शिरोळ - १, राधानगरी - १०, गगनबावडा - १६, भुदरगड - ९, गडहिंग्लज -४.४२, आजरा - ८.७५, चंदगड - १०.३३.