जिल्ह्यात संततधार; भोगावती नदी पात्राबाहेर

By Admin | Updated: June 22, 2015 00:47 IST2015-06-22T00:44:21+5:302015-06-22T00:47:29+5:30

जनजीवन विस्कळीत : ‘राजाराम’सह बारा बंधारे पाण्याखाली; गगनबावडा, आजऱ्यात १०० मिमी. पाऊस

Santhadhar in the district; Bhogavati river out of the river | जिल्ह्यात संततधार; भोगावती नदी पात्राबाहेर

जिल्ह्यात संततधार; भोगावती नदी पात्राबाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची संततधार राहिली. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, भोगावती नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आले आहे. पंचगंगा दुथडी भरून वाहू लागली, तर ‘राजाराम’सह बारा बंधारे सकाळीच पाण्याखाली गेले. गगनबावडा व आजरा तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ७१८.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात रविवारी दिवसभर संततधार पाऊस राहिल्याने सखल भाग जलमय झाला. व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, आदी भागांत रस्त्यावर फूट ते दीड फूट पाणी तुंबले. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. रविवार असल्याने सकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारावरही पावसाचा परिणाम दिसला.
धरणक्षेत्रात तर धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १७३, वारणा परिसरात ११०, दूधगंगा परिसरात १४२, कुंभी धरणक्षेत्रात तब्बल २१९, तर कोदे लघू पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात चोवीस तासांत ३०७ मिलिमीटर पाऊस झाला. नद्यांच्या पातळीत सकाळपासून झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी शनिवारपेक्षा तब्बल नऊ फुटांनी वाढून ती १७.९ फुटांपर्यंत पोहोचली आहे. या नदीवरील राजाराम, रुई, सुर्वे बंधारे सकाळी दहा वाजताच पाण्याखाली गेले असून, बंधाऱ्यांवर दोन फूट पाणी आहे. भोगावती नदीवरील कोगे, तर कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण, वाळोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण, काटे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
भोगावती नदीचे पाणी या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. पंचगंगा नदीचे पाणी अद्याप पात्रात असले तरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी काठांवरील पिकांत पाणी शिरले आहे. बंधाऱ्यावर पाणी व रस्ते खराब झाल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून, या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्रावर झाड कोसळून सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
आजऱ्यात नदीपात्रात वाढ
आजरा : गेले दोन दिवस आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना घरीच थांबविणे पसंत केले, तर पावसामुळे मैदानावर उपक्रम राबविणे शक्य नसल्याने काही शाळांनी व्हरांड्यावर, तर कांही शाळांनी वर्गातच ‘योगा’चे धडे दिल्याने विद्यार्थ्यांच्या पचनी कितपत पडणार? हा संशोधनाचा विषय आहे. एकंदर आजऱ्यात ‘योगा’वर पावसाचे पाणी पडले.
राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प
कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेला. बंधाऱ्याजवळ सध्या १९ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे.
बंधाऱ्याच्या फळ्या (लोखंडी प्लेटा) पाटबंधारे विभागाने १ जूनला काढल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्याची पातळी हळूहळू कमी होत गेली होती. नदीपात्र कोरडे झाले होत. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. शनिवारी दिवसरात्र पडलेल्या या पावसामुळे व रविवारीही पहाटेपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे बंधारा पाण्याखाली गेला.
बंधारा पाण्याखाली गेल्याचा फटका कसबा बावडा, वडणगे, निगवे, केर्ली, भुयेवाडी, आदी गावाला बसतो.
दरम्यान, कसबा बावडा आणि परिसरात पडत असलेल्या या दमदार पावसामुळे बळिराजा चांगलाच सुखावला आहे. सध्या परिसरात उसाला अंतिम रासायनिक खताचा ढोस देण्याचे काम जोरात सुरू आहे. खरीप भात भांगलणीच्या कामालाही आता जोर आला आहे.
ताम्रपर्णी, घटप्रभा नदी भरली
चंदगड : गेल्या दोन दिवसांत चंदगड तालुक्यात पावसाने जोर धरल्याने शेतकरी वर्ग रताळी व बटाटे लागवडीमध्ये मग्न आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन तब्बल १५ दिवसांनी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे १५ दिवसांनी शेतीची कामे पुढे गेली आहेत.शनिवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. सोमवारी दिवसभर ८७.१६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ताम्रपर्णी व घटप्रभा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सोमवारी रात्रभर जोर राहिल्यास घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडेल.
वारणा, कडवी नदीच्या दुथडी भरल्या
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पावसाची दिवसभर संततधार सुरू आहे. सरीवर सरी कोसळत आहेत. तालुक्यात रविवारी ८१. मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तालुक्यात २२४.५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.पावसाळा सुरू होऊन अवघ्या दहाव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वारणा, कडवी, कासारी व शाळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विशाळगड, गेळवडे, निनाईपरळे व चांदोली धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. वादळी वाऱ्यामुळे घराची कौले, उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी नदीपात्रात झाडे उन्मळून पडली आहेत.
पावसातही भाविकांच्या रांगा
जोतिबा : परिसरात पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. दाट धुके, गार वारा, संततधार पडणाऱ्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे. अधिक मास असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. भर पावसात भाविकांनी मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शन रांगा लावल्या होत्या.

गडहिंग्लजमध्ये लक्ष्मी चौकास तळ्याचे स्वरूप
गडहिंग्लज : शनिवारी दुपारीनंतर सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसाची संततधार रविवारीदेखील गडहिंग्लज शहर व तालुक्यात कायम राहिली. शहरातील तुंबलेल्या गटारींमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. लक्ष्मी चौकासह ठिकठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. गडहिंग्लजच्या आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. बाजाराला आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही त्रेधातिरपीठ उडाली. संततधार पावसामुळे नाले, ओढे, तलाव व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जोरदार पावसाने शेतकरी सुखावला असून, खोळंबलेल्या खरिपाच्या पेरणीला पुन्हा जोर येणार आहे.

रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
हातकणंगले- १५, शिरोळ- ५.१४, पन्हाळा- ६७.१४, राधानगरी- ४४.८३, गगनबावडा- १८४.५०, करवीर- ३३.१३, कागल- २४.०७, गडहिंग्लज- २५.१४, भुदरगड- ४९.८०, आजरा- १०१.२५, चंदगड- ८७.१७.

Web Title: Santhadhar in the district; Bhogavati river out of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.