कुरुंदवाडमधील संस्थानकालीन इमारतीचा श्वास गुदमरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:42+5:302021-02-05T06:59:42+5:30
कुरुंदवाड : येथील भालचंद्र थिएटर इमारत परिसरात राजरोसपणे मद्यपींकडून काचेच्या, प्लास्टिक बाटल्या टाकल्या जात आहेत. या इमारतीच्या सावलीत तसेच ...

कुरुंदवाडमधील संस्थानकालीन इमारतीचा श्वास गुदमरतोय
कुरुंदवाड : येथील भालचंद्र थिएटर इमारत परिसरात राजरोसपणे मद्यपींकडून काचेच्या, प्लास्टिक बाटल्या टाकल्या जात आहेत. या इमारतीच्या सावलीत तसेच रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे मटका खेळला जात आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील मध्यवर्ती असलेला भालचंद्र थिएटर परिसर तळीरामांचा अड्डा बनला आहे. अवैध कारनाम्यांमुळे संस्थानकालीन इमारतीचा श्वास गुदमरत आहे. त्यामुळे शहरवासीयांतून संताप व्यक्त होत असून थिएटर परिसर स्वच्छ राखण्याची मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी पालिकेने ही वास्तू पाडून व्यापारी संकुल उभे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. शहरातील काही नागरिकांनी संस्थानकालीन इमारत न पाडता त्याचे संवर्धन करावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने भालचंद्र थिएटर पाडण्यास मनाई आदेश दिला. जिल्हा वारसा वास्तू संवर्धन (हेरिटेज) समितीने दीड वर्षापूर्वी पाहणी केली होती. ही वास्तू पाडण्यास न्यायालयाने मनाई केल्याने पालिका प्रशासनाने या वास्तूकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तळीरामांना फावले असून ही इमारत आणि परिसर अवैध कारनाम्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून पोलीस व पालिका प्रशासनाने थिएटर परिसरात चालणाऱ्या अवैध कारनाम्यांना आळा घालण्याची मागणी होत आहे.
...........
कोट -
भालचंद्र टॉकीजची वास्तू जर अशा बेकायदेशीर कृत्यांपासून मुक्त केली नाही आणि त्याचे नूतनीकरण लवकरात लवकर झाले नाही, तर लवकरच त्यासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू. तसेच सध्या महाराष्ट्र शासनाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली आहे. त्यानुसार हेरिटेज वास्तूची जपणूक करणे पालिकेवर बंधनकारक आहे. त्याची आठवण करून देण्याची गरज आहे.
- अॅड. धैर्यशील सुतार
फोटो - ०२०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
कुरुंदवाड येथील भालचंद्र टॉकीज परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून अशाप्रकारे दारूच्या बाटल्या टाकल्या जात आहेत.