नूलच्या गडकरी गल्लीत ‘सन्नाटा’; महागावच्या अपघाताने शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:50 IST2019-04-15T00:50:45+5:302019-04-15T00:50:51+5:30
राम मगदूम । लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : महागावनजीकच्या अपघातात मरण पावलेले सुमो चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज ...

नूलच्या गडकरी गल्लीत ‘सन्नाटा’; महागावच्या अपघाताने शोककळा
राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : महागावनजीकच्या अपघातात मरण पावलेले सुमो चालक नामदेव चव्हाण, त्यांचा मुलगा मनोज व आप्पा सुपले यांच्यावर शनिवारी रात्री अकराला, तर इंजिनिअर चंद्रकांत गरूड यांच्यावर रविवारी पहाटे चारला अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही गडकरी गल्लीतील रहिवासी असल्यामुळे शनिवारी रात्री गल्लीतील एकही चूल पेटली नाही. सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या अकाली मृत्यूमुळे गडकरी गल्लीवर मोठा आघात झाला आहे. रविवारी दिवसभर या गल्लीत सन्नाटाच होता.
शिवकालीन किल्ले सामानगडचे सेवक म्हणून ओळखले जाणारी अठरापगड जातीची कुटुंबं श्री शंभू महादेवाच्या देवळानजीक अनेक वर्षांपासून एकत्र राहतात. म्हणूनच या गल्लीला ‘गडकरी गल्ली’ म्हणून ओळखले जाते.
२०१२ पासून या गल्लीतील महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. त्यात चव्हाण व सुपलेंचा सक्रिय सहभाग होता. या मंदिराची वास्तुशांती व कलशारोहण सोहळा मे मध्ये करण्याचे नियोजन सुरू असतानाच दोघेही एकाचवेळी देवाघरी गेले.
आजवर एकही वाईट प्रसंग न ओढवलेल्या ‘नामदेव’च्या गाडीतून या गल्लीतील काही मंडळी लोकसभेच्या प्रचारसभेकरिता सरंबळवाडीला गेली होती. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेले गरूडदेखील याच गाडीत होते. गल्लीतील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गडकरी गल्लीसह संपूर्ण गावच सुन्न झाले आहे.
आधारच तुटला..!
सुमो चालक नामदेव व त्यांचा मुलगा मनोज याच्या मृत्यूमुळे त्यांच्या अल्प भूधारक कुटुंबाचा आधारच तुटला आहे. पती व मुलाच्या एकाचवेळी अकाली जाण्याने त्यांच्या पत्नी व मुलींना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
‘महादेवा’चे
भक्त म्हणून..!
चव्हाण व सुपले हे शंभू महादेवाचे भक्तहोते. महादेवाच्या वार्षिक यात्रेत दोघेही हिरिरीने भाग घेत. महादेवाचा वार असल्याने सोमवारी रक्षाविसर्जन न करण्याची गल्लीची प्रथा आहे. त्यामुळे त्यांचे रक्षाविसर्जनही रविवारी करण्यात आले.