संजीव पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला-पोलिसाचाही समावेश : सनी पोवार मृत्यूप्रकरण
By Admin | Updated: September 15, 2014 23:46 IST2014-09-15T23:40:09+5:302014-09-15T23:46:48+5:30
अटकेचे दिल्लीहून आदेश

संजीव पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला-पोलिसाचाही समावेश : सनी पोवार मृत्यूप्रकरण
कोल्हापूर : वडगाव (ता. हातकणंगले) येथील जगदिश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील व पोलीस नाईक धनाजी शिवाजी पाटील यांचा आज, सोमवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. बसवर दगडफेक केल्याच्या कारणावरून वडगाव पोलिसांनी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईक व दलित संघटना आक्रमक होऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. तसेच संबंधित पोलीस अधीकारी संजीव पाटील, बबन शिंदे व धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तत्काळ पाटील यांच्यासह दोघा पोलिसांना निलंबित केले. त्यानंतर मृत सनीचा भाऊ जयदीप पोवार याने फिर्याद दिल्याने तिघांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (३०२) दाखल झाला. त्यापासून ते पसार होते. सीआयडी पोलिसांनी यापूर्वी बबन शिंदे याला अटक केली, तर संशयित आरोपी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व धनाजी पाटील हे पसार झाले. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी जोरदार हरकती घेत मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानत अतिरिक्त न्यायाधीशांनी दोघांचेही अर्ज नामंजूर केले. (प्रतिनिधी)
अटकेचे दिल्लीहून आदेश
संजीव पाटील व धनाजी पाटील हे दोघे कायद्याचा आधार घेत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला असला तरी ते उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे समजते. दरम्यान, या दोघांना अटक करण्यासाठी दिल्ली येथील केंद्रीय सीआयडी विभागाने पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. तपास अधिकारी मा. शा. पाटील यांना हे पत्र मिळाले आहे. त्यानुसार या दोघांना दिसताक्षणी अटक केली जाणार आहे.