नियत साफ नसल्यानेच संजयबाबांचा पत्ता कट

By Admin | Updated: April 10, 2015 00:56 IST2015-04-10T00:46:05+5:302015-04-10T00:56:53+5:30

हसन मुश्रीफ यांचा टोला : उमेदवारी डावलण्यामागे लोकसभेचे राजकारण

Sanjaybaba's address cut due to lack of clearance | नियत साफ नसल्यानेच संजयबाबांचा पत्ता कट

नियत साफ नसल्यानेच संजयबाबांचा पत्ता कट

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत संजय घाटगे यांना सत्तारूढ गटाकडून उमेदवारी नाकारल्यावर त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी माझ्याविरोधी घोषणा दिल्याचे वाचून मला त्यांची सहानुभूती वाटली. राग आला नाही. कारण महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश देताना जसे कर्म असते त्याप्रमाणे फळ मिळते व नियत साफ असेल तर भाग्य उदयाला येते, असे सांगितले आहे. या प्रकरणामध्ये तंतोतंत त्याप्रमाणे घडले असून संजय घाटगे यांची नियत चांगली नसल्यानेच त्यांचा सत्तारूढ आघाडीतून पत्ता कट झाल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. गुरुवारी त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘मी संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना आठवण करून देतो की, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून व्हन्नाळीतील ‘समृद्धी’च्या माळावर माझे कौतुक करून विधानसभेमध्ये पाठिंबा देण्याचे वचन घाटगे यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो. अंबरिश यास सभापतिपद दिले. गोकुळ दूध संघामध्ये एक स्त्री उमेदवार कमी देऊन सर्व मते अरुंधती वहिनींना दिली व त्या सर्वांत जास्त मतांनी निवडून आल्या. संघामध्ये हे पद त्यांच्याकडेच राहावे म्हणून दूध संस्था काढून देण्यासाठी मंत्रिपद पणाला लावले. त्यांची इतकी गडबड होती की, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कशा संस्था होतील यासाठी रात्रीचा दिवस ते करत होते. त्यांची नियत साफ नव्हती. विधानसभेला विश्वासघात करायचा, हे त्यांनी पक्के ठरवले होते. संस्था करून घेतल्या व त्यानंतर सूर्याजी पिसाळांचा इतिहास माहीत आहेच.
ज्यावेळी दिवंगत नेते मंडलिक मंत्री होते त्यावेळी विक्रमसिंह घाटगे यांच्याशी मतभेदानंतर उपसभापतिपद व इतर सर्व पदे संजय घाटगे यांनी मिळविली व विधानसभेचे मंडलिक यांना वचन दिल. परंतू लगेच १९९५ च्या विधानसभेमध्ये ते मंडलिक यांच्या विरोधात गेले.
त्यांची गोकुळमधील उमेदवार डावलण्यामागे लोकसभा निवडणुकीचा संदर्भही आहे. संजय घाटगे यांनी काँग्रेसची सर्व फळे चाखली. परंतु विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मंडलिक यांचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार केला. मंडलिक यांनी आपला ‘शब्द’ पाळला व विधानसभेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. आज मंडलिकसाहेब हयात नाहीत. प्रा. संजयदादांच्या मागे मी उभे राहणार, अशी घोषणा त्यांनी केली. मग प्रा. संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. मग तुमचा सत्तारूढ गटाकडे जाण्याचा हट्ट का? माझा त्यांच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे की ‘शब्द’ देऊन ज्या ज्यावेळी त्यांनी भूमिका बदलली त्यावेळी अशा घोषणा का दिल्या नाहीत? त्यांची उमेदवारी टिकविण्याची जबाबदारी त्यांची होती, ती माझी नाही.

व्हनाळीची अंबाबाई जागृत
मुश्रीफ म्हणतात, ‘मी संजय घाटगे यांच्याकडून फसवला गेलेला विरोधक आहे. व्हन्नाळीची अंबाबाई जागृत आहे. ती सर्व पाहते आहे. नियत साफ नसणाऱ्या व्यक्तीवर परमेश्वर कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे भाग्य उदयास येऊ शकत नाही. यदाकदाचित काही झालेच तर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीला परमेश्वर पावेल. सूर्याजी पिसाळांसारख्या ‘कर्तृत्ववान’ माणसाला पावणार नाही.

Web Title: Sanjaybaba's address cut due to lack of clearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.