संजय साडविलकर यांनी अवैध शस्त्रे आणली कुठून - समीर गायकवाडची पोलिसांत तक्रार-‘एसआयटी’ करणार तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:38 IST2017-11-21T18:38:03+5:302017-11-21T18:38:16+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत.

संजय साडविलकर यांनी अवैध शस्त्रे आणली कुठून - समीर गायकवाडची पोलिसांत तक्रार-‘एसआयटी’ करणार तपास
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत. ते अवैध गावठी पिस्तुल, रिव्हॉल्व्हर शस्त्र खरेदी-विक्री व त्यांची दुरूस्तीचा व्यवसाय करीत होते. हा गुन्हा असून त्यांनी अवैध शस्त्रे आणली कुठून, ती कोणाला विक्री केली, कुणाकडून खरेदी केली. त्यातून गुन्हे घडले किती याची सखोल चौकशी करावी, अशी तक्रार संशयित आरोपी समीर गायकवाड याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी केली. या तक्रार अर्जानुसार पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (एसआयटी) करणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.
समीरने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पानसरे व दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुख्य साक्षीदार संजय साडविलकर यांची ‘इन कॅमेरा’ साक्ष न्यायालयात झाली. त्यामध्ये माझ्याकडे कुठलाही जगण्यासाठी व्यवसाय नसल्याने मी सन १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या कालावधीत गावठी पिस्तुल खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला आहे, अशी कबुली दिली होती. न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्राची एक प्रत मला मिळाली होती. ती वाचल्यानंतर ही बाब मला खटकत होती. शस्त्रे विकून किती गुन्हे घडले असतील, त्याचा काय परिणाम झाला असेल. त्यानुसार वकिलांचा सल्ला घेऊन साडविलकर यांच्याविरोधात तक्रार दिली असून सखोल चौकशी व्हावी. यावेळी त्याच्यासोबत अॅड. समीर पटवर्धन, अॅड. श्रीपाद होमकर, आशाताई पोतदार, किरण कुलकर्णी, दिलीप पाटील, किशोर घाटगे, शिवाजीराव ससे, सुनील पाटील, सुधाकर सुतार, बाळासाहेब निगवेकर आदी उपस्थित होते.
साक्षीदारांवर दबावाचा हेतू नाही
साक्षीदार साडविलकर यांनी सीबीआय आणि एसआयटीच्या चौकशीमध्ये न्यायालयात शस्त्र खरेदी-विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करत असल्याची स्वत: कबुली दिली आहे असे असताना त्यांच्यावर तक्रार देणे कितपत योग्य आहे. एकप्रकारे साक्षीदारावर दबाब निर्माण करण्याचे तुमचे नियोजन आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी समीरला केला. त्यावर पानसरे हत्येचा माझ्यावर आरोप असला तरी शस्त्रे विकणे आणि खरेदी करणे हा गुन्हा आहे. साक्षीदार व पोलिसांवर दबाव आणण्याचा कोणताही हेतू नाही.
पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याने मंगळवारी साक्षीदार संजय साडविलकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. यावेळी सोबत अॅड. समीर पटवर्धन व कार्यकर्ते.