संजयकुमार यांनी घेतली उमा पानसरे यांची भेट
By Admin | Updated: May 5, 2015 01:13 IST2015-05-05T01:13:18+5:302015-05-05T01:13:18+5:30
घटनास्थळाचीही पाहणी

संजयकुमार यांनी घेतली उमा पानसरे यांची भेट
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांची सोमवारी सकाळी घरी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत हल्ल्यासंदर्भात काही माहिती त्यांच्याकडून त्यांनी घेतली. त्यानंतर घटनास्थळाचीही त्यांनी पाहणी केली.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबीक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, यासंदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. दोन महिने होऊनही या हत्येचा तपास होत नाही, यासंदर्भात पानसरे यांची मुलगी स्मिता आणि सून मेघा यांनी दि. १८ एप्रिलला उच्च न्यायालयात एक स्वतंत्र याचिका दाखल करून हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वीच राज्य सरकारने पानसरे हत्या प्रकरणाचे सर्वाधिकार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्याकडे दिले.तेरा दिवसांच्या कालावधीत कोणत्या स्तरावर तपास सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी ते सोमवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. पानसरे यांच्यावर सकाळी नऊच्या सुमारास हल्ला झाला होता. त्याच वेळेत त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आजूबाजूला वस्ती किती आहे, कोण-कोण राहते, याचीही देखील त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी उमातार्इंची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करत त्यांचे खचलेले मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला तसेच एसआयटीची पथक कसा तपास करणार आहे, याची माहितीही त्यांना दिली. त्याचबरोबर हल्ल्यासंदर्भात मारेकऱ्यांबाबत त्यांनी माहिती घेण्याचाही प्रयत्न केला.