संजय घाटगे यांना निवृत्त होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:09+5:302021-02-14T04:23:09+5:30
साके : संजयबाबा आणि मी काॅलेज जीवनात एकाच संघात खेळत होतो. दोघेही वेगवान गोलंदाज होतो. ...

संजय घाटगे यांना निवृत्त होऊ देणार नाही
साके : संजयबाबा आणि मी काॅलेज जीवनात एकाच संघात खेळत होतो. दोघेही वेगवान गोलंदाज होतो. राजकारणात आम्ही सहा विधानसभा, दोन जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक निवडणुका एकमेकांविरूद्ध लढलो. संजय घाटगे यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. राज्यसभेत गुलाम नबी आझाद आणि पंतप्रधान मोदींच्या भाषणाची मला आठवण झाली. जसे मोदी आझादांना म्हणाले की, मी तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही, तसे मीही संजय घाटगे यांना निवृत्त होऊ देणार नाही, अशी टिप्पणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
केनवडे येथील अन्नपूर्णा शुगर आणि जॅगरी वर्कस्च्या चाचणी गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आबीटकर, सुरेश हाळवणकर, श्रीपतराव शिंदे, बंजरग देसाई, अरुण इंगवले आदी उपस्थित होते.
संजय घाटगे यांंनी मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करीत जुन्या आठवणी जागवल्या. काॅलेज जीवनापासून आम्ही मित्र आहोत. तेव्हापासून ते जरा हुषार आहेत. मी आपला सरळ मार्गी म्हणून मला थोडक्यात पराभव पत्करावे लागले. हरकत नाही, एका कर्तबगार नेत्याकडून पराभव झाला म्हणून दु:ख वाटत नाही, असे ते म्हणाले. पी. एन. पाटील यांनी संजय घाटगेंच्या लढाऊ कार्यकर्त्यांचे कौतुक करीत, मंत्री मुश्रीफ यांच्यात सहकार्याची वृत्ती असल्याचे सांगितले.
..........
संजय घाटगे यांना अश्रू अनावर
आपल्या भाषणात संजय घाटगे यांना रडू कोसळले. त्यांनी मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. घरातील काही तरी विकावे लागणार, हे माहीत असूनही माझ्या प्रत्येक निवडणुकीसाठी हिरीरीने पुढे येणाऱ्या सौभाग्यवती अरुंधती घाटगे यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
लोकांत उत्साह अन उत्सुकता
केनवडेच्या माळावर उभा राहिलेल्या या प्रकल्पाची मोठी उत्सुकता या परिसरात होती. तालुक्यातून या गटाचे लोक आले होते. तसेच परिसरातील महिला, पुरुष सहकुटुंब नटून थटून वाजत गाजत आले होते. मुश्रीफ गटाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
...........
१३ अन्नपूर्णा
केनवडे (ता. कागल) येथील अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी गव्हाणीत मोळी टाकताना मंत्री सुभाष देसाई, हसन मुश्रीफ, संजय घाटगे, खासदार मंडलिक आदी उपस्थित हाेते.