संजय घाटगे शिवबंधनात अडकणार
By Admin | Updated: August 19, 2014 00:39 IST2014-08-19T00:28:10+5:302014-08-19T00:39:14+5:30
उद्धव ठाकरे गुरुवारी दौऱ्यावर :हमीदवाडा, सरुड येथे मेळाव्यास प्रमुख उपस्थिती

संजय घाटगे शिवबंधनात अडकणार
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गुरुवारी (दि. २१) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते सेना प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्याची सुरुवात माजी आमदार संजय घाटगे यांनी केली आहे. त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. इतरांचा निर्णय महायुतीच्या जागावाटपाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
विधानसभा निवडणुकीची काही दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीतही चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. याच धामधुमीतून वेळ काढत उद्धव ठाकरे यांनी खास कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आखला आहे. त्यांच्या दौऱ्यात हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व शेतकरी मेळावा होणार आहे. या ठिकाणी माजी आमदार संजय घाटगे शिवबंधनात अडकून शिवसेनेचा ‘भगवा’ खांद्यावर घेणार आहेत. त्याचबरोबरआसपासच्या विधानसभा मतदारसंघातील इतर नेतेही या ठिकाणी ‘भगवा’ हातात घेण्याच्या तयारीत आहेत; परंतु त्यांचे घोडे महायुतीच्या जागा वाटपाच्या निर्णयामुळे अडकले आहे. याचवेळी भुदरगडचे प्रकाश आबिटकर सेना प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आ. रामदास कदम, आ. सुभाष देसाई, खा. संजय राऊत, आ. डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते आ. दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर दुपारी २ वाजता सरुड (ता. शाहूवाडी) येथील शिव-शाहू महाविद्यालयाच्या पटांगणावर होणाऱ्या पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील शिवसैनिकांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांच्या प्रचारात नसणारे व काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप होत असलेल्या सत्यजित पाटील-सरुडकरांच्या मेळाव्याचे ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारुन आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. इथून मागे सेनेचे व्यासपीठ कटाक्षाने टाळणारे व महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणाऱ्या सरुडकरांना फक्त आमदारकीपुरतीच सेना पाहिजे का? असा सवाल महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)