संजय घाटगे गटाला नवसंजीवनी

By Admin | Updated: April 8, 2017 00:11 IST2017-04-08T00:11:02+5:302017-04-08T00:11:02+5:30

अंबरिश घाटगे यांची निवड : कागल तालुक्यातील राजकारण कारणीभूत

Sanjay Ghatge Gatala Navsanjivani | संजय घाटगे गटाला नवसंजीवनी

संजय घाटगे गटाला नवसंजीवनी

दत्ता पाटील --म्हाकवे --कागल पंचायत समितीच्या सभापती निवडीदरम्यान प्रा. संजय मंडलिक यांनी अनपेक्षितपणे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी युती केल्याने माजी आमदार संजय घाटगे एकाकी पडले होते. यामुळे घाटगे गटाचे मनोधैर्य खचले होते. मात्र, जि. प.च्या सभापती निवडीत अंबरिश घाटगे यांना अर्थ आणि शिक्षण सभापती पद मिळाल्याने या गटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. किंबहुना संजय घाटगे गटाचा एकमेव सदस्य असतानाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी या गटाला सभापतिपद दिले. मुश्रीफांचा वारू रोखण्यासाठीच घाटगे गटाला बळकटी दिल्याचेही राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.
जि. प. व पं. स.ची निवडणूक मंडलिक व संजय घाटगे गटाने एकत्रितपणे लढविली. मात्र, पंचायत समितीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीला समान संधी मिळाली. त्यामुळे सभापती निवडीचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी प्रा. मंडलिकांनी मुश्रीफांशी चर्चा करून पदांचा कालावधी निश्चित करून ही प्रक्रिया पूर्ण केली, परंतु यामध्ये गेल्या सात वर्षांपासून एकत्रित असणाऱ्या मंडलिक-संजय घाटगे गटामध्ये दुरावा निर्माण झाला.
तसेच, आगामी काळात मुश्रीफांशी टक्कर देणे संजय घाटगे गटाला डोईजड बनले. त्यामुळे हा गट काहीसा हतबल झाल्याचे दिसत होते. मात्र, कागल तालुक्यातील राजकीय वातावरण एकतर्फी होऊ नये या दृष्टीने जाणकार मंडळींनी
अंबरिश घाटगे यांना सभापतिपदाची माळ गुंफून घाटगे गटाला
एकप्रकारे राजकीय पाठबळ दिल्याचेच बोलले जात
आहे.
दरम्यान, अंबरिश घाटगे यांच्या निवडीने कागल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह सर्वच कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. गावोगावी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजनही केले जात आहे.



अनुभवाचे फलित
संजय घाटगे गटाला तब्बल ३५ वर्षांपासून पंचायत समितीमध्ये जनतेने सत्तेत कायम ठेवले. २००७ ते १२ मध्ये अंबरिश घाटगे हे सभापती होते, तर २०१२ ते १७ पर्यंत सुयशा घाटगे या जि. प. सदस्या होत्या. त्यामुळे घाटगे कुटुंबीयांचे जनसामान्यांशी घट्ट नाते जुळले असून, हा सर्व अनुभव अंबरिश यांच्या निवडीने सत्कारणी लागल्याचे बोलले जात आहे.


देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद असणाऱ्या भावी पिढीचा पाया हा प्राथमिक शाळेमध्येच घातला जातो. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र कामात राजकारण न आणता जिल्ह्यातील सर्वच शाळांचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता उंचाविण्यासाठी मी सर्व नेतेमंडळींच्या सहकार्यातून कटिबद्ध आहे.
- अंबरिश घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती


हारतुरेऐवजी वह्या संकलित करणार : घाटगे
जि. प.च्या शिक्षण सभापती पदाची सूत्रे अंबरिश घाटगे यांनी बुधवारी स्वीकारली. यावेळी त्यांना भेटायला येणाऱ्या शिक्षकांसह कार्यकर्त्यांना हारतुरेऐवजी वह्या देऊन सत्कार करण्याचे आवाहन केले. या संकलित होणाऱ्या वह्या शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी यासारख्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही घाटगे यांनी सांगितले.

Web Title: Sanjay Ghatge Gatala Navsanjivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.