अध्यक्षांकडून सडोली खालसामध्ये स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:42+5:302021-09-18T04:24:42+5:30
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ...

अध्यक्षांकडून सडोली खालसामध्ये स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत शिरोली (पुलाची) येथे खासदार धैर्यशील माने यांनी स्वच्छता श्रमदान व शोषखड्डा बांधकाम प्रारंभ केला, तर ग्रामपंचायत सडोली (खालसा) येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मसोली, ता. आजरा येथे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.
ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता श्रमदान करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छताफेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छता संदेश देण्यात आला. गावामध्ये स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे बांधकाम शुभारंभ व प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
१७०९२०२१ कोल झेडपी ०१
करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.