एलईडी दिव्यांनी उजळला सांगलीचा आयर्विन पूल
By Admin | Updated: August 11, 2014 23:34 IST2014-08-11T23:06:55+5:302014-08-11T23:34:59+5:30
सौंदर्यात भर : महापालिकेचा उपक्रम; सांगलीकरांची गर्दी

एलईडी दिव्यांनी उजळला सांगलीचा आयर्विन पूल
सांगली : सांगलीच्या लोकजीवनात मानाचे स्थान मिळविलेल्या आयर्विन पुलाचे भाग्य अखेर उजळले. गेली ८५ वर्षे सांगलीकरांना सेवा देणारा हा पूल एलईडी दिव्यांनी उजळला आहे. महापालिकेने या पुलाचे सुशोभिकरण केले असून हा नजारा नजरेत साठवण्यासाठी सांगलीकरांची गर्दी होत आहे.
भूतपूर्व सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी १९२७ मध्ये या पुलाचे काम हाती घेतले. सहा लाख रुपये खर्चून हा पूल १८ नोव्हेंबर १९२९ रोजी पूर्ण झाला. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड बॅटन आयर्विन यांच्याहस्ते या पुलाचे उद्घाटन झाल्याने पुलाला ‘आयर्विन पूल’ असे नाव पडले. घडीव दगडांपासून बांधलेल्या या देखण्या, आकर्षक पुलाची लांबी ८२० फूट, रुंदी ३२ फूट, तर उंची ७० फूट आहे. पुलाचे गर्डर्स, आय चॅनेल्स इटलीहून मागविण्यात आले. महापुराचे पाणी पाहण्यासाठी पुलाखाली गॅलरी, जिने यांची व्यवस्था करण्यात आली. सांगलीच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून आयर्विन पुलाकडे पाहिले जाते.
राज्यातील अनेक महापालिकांनी आपापल्या क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन केले आहे. त्यामुळे त्या शहरांची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर सांगली महापालिकेनेही चौक, उद्यानांच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. त्यात ‘आयर्विन’च्या सुशोभिकरणाची संकल्पना स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी मांडली. ‘आयर्विन’सोबतच वसंतदादा स्मारक, कृष्णाघाट या परिसराचाही सुशोभिकरणात समावेश केला आहे. मुंबई, पुणे, कऱ्हाडहून सांगलीत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आयर्विन पुलाकडूनच स्वागत होत असल्याने या पुलावर एलईडी दिवे बसवून नागरिकांसाठी विरंगुळ्याचे स्थळ निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला.
गेल्या तीन महिन्यात खासगी कंपनीच्या माध्यमातून आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या गॅलरीतही दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे प्रतिबिंब कृष्णेच्या पाण्यात पडत आहे. त्यामुळे ‘आयर्विन’चे सौंदर्य आणखीनच उजळले आहे. पाण्यातून प्रतिबिंबित झालेल्या प्रकाशाने आयर्विनला नवी झळाळी आली आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च झाले आहेत.
सध्या तरी एक रुपयाही संबंधित कंपनीला देण्यात आलेला नाही. पुढील पाच वर्षे कंपनीला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यावयाचे असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही या कंपनीकडेच देण्यात आली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
सांगलीकरांच्या विरंगुळ्यासाठी उद्याने, चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविले आहेत. या दिव्यांमुळे पुलाचे सौंदर्य खुलले असून लवकरच अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रमही घेणार आहोत. या कामासाठी ठेकेदाराला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही.
- राजेश नाईक, सभापती,
स्थायी समिती, महापालिका