सांगली, मिरजेतील तिबेटियन, नेपाळी परतले

By Admin | Updated: April 27, 2015 00:15 IST2015-04-26T23:41:55+5:302015-04-27T00:15:29+5:30

चार पर्यटक सुखरूप : जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष

Sangli, Tibetan in Mirage, Nepalese returned | सांगली, मिरजेतील तिबेटियन, नेपाळी परतले

सांगली, मिरजेतील तिबेटियन, नेपाळी परतले

सांगली : शहरात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणारे (चायनीज), तिबेटियन स्वेटर विक्रेते कालच नेपाळला रवाना झाले आहेत. त्यामुळे चायनीज विक्रीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, नेपाळमध्ये गेलेले सांगलीतील चार पर्यटक सुखरुप असल्याचे वृत्त असून, त्यांना शिबिरामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरु करण्यात आला असून यामध्ये नव्याने नोंदणी मात्र झालेली नाही.
सांगली शहरात चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारे व स्वेटर विक्रेते असे सुमारे शंभरावर आहेत. यामधील सुमारे तीस ते चाळीस जण कालच नेपाळला रवाना झाले आहेत. चायनीज विक्रेत्यांमध्ये तरुणांचा सहभाग अधिक आहे. हे तरुण स्थानिक चायनीज विक्रेत्यांकडे काम करतात. त्याचबरोबर स्वेटर विक्री सध्या बंद असली तरी आजुबाजूच्या यात्रा, उत्सवात ते विक्री करीत असतात. शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे वृत्त समजताच नेपाळी व तिबेटियन नागरिक तात्काळ परतले आहेत. काही कामगार आपल्या पगाराची रक्कम आगाऊ घेऊन रवाना झाले आहेत. त्यामुळे शहरातील चायनीज विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालया- बरोबरच सर्व तहसील कार्यालयात शनिवारपासूनच आपत्ती निवारण कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षाकडून ट्रॅव्हल एजन्सीजकडे संपर्क साधण्यात आला आहे. मात्र नव्याने कोणी बेपत्ता किंवा संपर्काविना असल्याचे आढळले नाही. नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी सांगलीतील चार पर्यटक गेले होते. त्यांच्याशी संपर्क झाला असून, ते सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये अमोल अप्पासाहेब पाटील (रा. महसूल कॉलनी, शामरावनगर), सचिन उदगावे (वारणाली वसाहत), स्वप्निल कुंभारकर व त्यांची पत्नी मानसी कुंभारकर (रा. गव्हर्मेंट कॉलनी) यांचा समावेश आहे. त्यांना सध्या भारताकडून सुरु केलेल्या निवास शिबिरामध्ये आश्रय देण्यात आला असून, लवकरच त्यांना दिल्लीत आणण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)


भूकंपग्रस्तांसाठी मिरजेतील अधिकाऱ्याची सेवा
नेपाळमधील भूकंपामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी लष्कराच्या हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले मिरजेचे मनीष मैंदर्गी हे रात्रं-दिवस सेवा देत आहेत. भारत सरकारने नेमलेल्या दहा पथकांतील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे आहे. मैंदर्गी हे गेल्या पंधरा वर्षांपासून हवाई दलात आहेत. सध्या ते चंदीगड येथे सेवेत आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी काल दहा लष्कराची पथके नेमण्यात आली. त्यामधील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे असून, काल दुपारीच ते ५५० प्रवाशांच्या क्षमतेचे लष्करी विमान घेऊन काठमांडूला रवाना झाले. काल रात्री उशिरापर्यंत त्यांनी काठमांडू ते दिल्ली अशा चार खेपा करून सुमारे दीड हजार भारतीयांची सुटका केली आहे. आणखी चार दिवस ही सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी मिरजेतील आपल्या नातेवाईकांना कळवले आहे.

Web Title: Sangli, Tibetan in Mirage, Nepalese returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.