सांगली उपांत्य फेरीत

By Admin | Updated: December 23, 2014 23:40 IST2014-12-23T23:36:26+5:302014-12-23T23:40:50+5:30

राज्य कबड्डी : पुण्याकडून रत्नागिरीचे आव्हान संपुष्टात

Sangli quarter-finals | सांगली उपांत्य फेरीत

सांगली उपांत्य फेरीत

पुणे : महापौर चषक राज्य कबड्डी स्पर्धेत आज पुणे आणि सांगली या दोन्ही संघांनी विजयी घोडदौड कायम ठेवत पुरुष तसेच महिला गटांतून उपांत्य फेरीत धडक दिली. महिलांच्या गटात उपांत्य फेरीत पुणे-सांगली आणि मुंबई शहर-मुंबई उपनगर अशा लढती रंगणार आहेत.
धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील मैदानावर महिला गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये पुणे संघाने रत्नागिरी संघाचे आव्हान ६९-१३ने संपविले. मध्यंतरालाच पुण्याच्या सायली केरीपाळे, लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांनी आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी संघाला सर्वच आघाड्यांवर नामोहरम केले आणि ६ लोण लावत तीन बोनस वसूल केले. त्यांना अंकिता मोहोळ, पूजा शेलार व किशोरी शिंदे यांनी चांगल्या पकडी करीत मोलाची साथ दिली. रत्नागिरीच्या स्मिता पांचाळ हिने चांगला खेळ केला.
सांगली संघाने रायगडचा ४८-२९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सांगलीकडे ३१-७ अशी मोठी आघाडी होती. शीतल मोरे व गितांजली बनसे यांच्या चौफेर चढायांच्या जोरावर सांगलीने बाजी मारली. त्यांना पल्लवी जाधव व नेहा सांगलीकर यांनी सुरेख साथ दिली. रायगडच्या वैशाली पाटील व हेमांगी पाटील यांनी सांगलीच्या संघाला चांगली झुंज दिली. मुंबई शहर संघाने लौकीकाला साजेसा खेळ करीत औरंगाबाद संघाचा ४६-५ने धुव्वा उडविला. अनुभवी स्नेहल साळुंके व सुवर्णा बारटक्के विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
राजश्री पवार व राणी उपहार व अभिलाषा म्हात्रे यांच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई उपनगर संघाने कोल्हापूरला ५६-५ने लोळवून अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले. मध्यंतराला मुंबई उपनगर २९-३ने आघाडीवर होते. कोमल देवधर व मिनल जाधव यांनी चांगली पकड करीत विजयाला हातभार लावला. कोल्हापूरच्या अरूणा सावंत व शुभदा माने यांनी चांगला खेळ केला.
पुरूष विभागात उपांत्यपूर्व लढतीत यजमान पुणे संघाने ठाणे संघावर २०-१५ने मात केली. मध्यंतराला पुणे संघाकडे ११-३ अशी आघाडी होती. अक्षय जाधव याने केलेल्या खोलवर चढाया व त्याला विकास काळे, शिवराज जाधव यांचे मिळालेले सहकार्य यामुळे पुण्याचा संघ बचाव व आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर ठाण्यापेक्षा सरस ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)


नितीन, काशिलिंगचा धमाका
सांगली जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई शहर संघाला २४-८ने पाणी पाजून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मध्यंतराला सांगली संघ १५-४ने आघाडीवर होता. सांगलीच्या भागश भिसे याने अष्टपैलू खेळ करीत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. स्टार खेळाडू नितीन मदने व काशिलिंग आडके यांनीदेखील जोरदार खेळ करीत प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली.

Web Title: Sangli quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.