रब्बीच्या पेरणीत सांगली आघाडीवर
By Admin | Updated: October 16, 2014 22:51 IST2014-10-16T22:37:07+5:302014-10-16T22:51:51+5:30
कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर

रब्बीच्या पेरणीत सांगली आघाडीवर
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परतीचा मान्सून समाधानकारक झाल्यामुळे विभागात रब्बी पिकांच्या पेरणीत सांगली जिल्हा सध्या आघाडीवर आहे. तब्बल ५३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याउलट कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर आहे. या जिल्ह्यात पेरक्षेत्र अतिशय नगण्य आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात अपेक्षेइतकी रब्बीची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागत असतात. यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत खरीप पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
शेतकरी खरीप पिकांची काढणी झालेल्या जमिनीची मशागत करून प्रत्येक वर्षी रब्बी पिकांची पेरणी करीत असतो. सांगली, सातारा जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला गती आली आहे.
सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांत परतीच्या मान्सूनने चांगली ‘कृपा’ केली. यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण झाली
आहे. हवामानही पोषक आहे. यामुळे हा हंगाम साधण्यासाठी
शेतकरी जोरदार तयारीला लागले आहेत. ओल कमी होण्याआधीच पेरणीचे काम संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ज्वारी ३३५ हेक्टर, मका ११००, इतर
तृणधान्ये ३४६००, इतर अन्नधान्ये ३४६०० हेक्टर; तर सांगली
जिल्ह्यात ज्वारी ४८७०० हेक्टर, मका ३६००, इतर तृणधान्ये ५२३००, अन्नधान्य ५२३००, करडई ८००, सूर्यफूल ४००, इतर धान्य १००, अन्य धान्ये १३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. परतीचा मान्सूनही सर्वत्र बरसला आहे. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा रब्बीचे क्षेत्र वाढेल असे वाटते. ज्वारी, गहू, हरभरा यांचे पेरक्षेत्र वाढेल. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहेत.
- डॉ. एन. टी. शिसोदे (सहसंचालक, कृषी विभाग)
एकाच वेळी धांदल
अनेक ठिकाणी खरीप पिकांच्या काढणीचे आणि रब्बी पिकांच्या पेरणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शिवारात दिसत आहेत. शिवारे फुलून गेली आहेत. मागणी वाढल्यामुळे मजुरांची चणचण भासत आहे. जादा मजुरी देऊन मजुरांना बोलाविले जात आहे. मजुरांचाही भाव वधारला आहे.