सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच हवा
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:48:36+5:302015-06-04T00:01:11+5:30
जयंत पाटील : सरकारची अवस्था दोलायमान

सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच हवा
सांगली : निवडणुकीच्या काळात सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा भाजपने केल्या होत्या. संपूर्ण टोलमुक्तीच्या घोषणेची अंमलबजावणी अजून झालेली नाही. सांगली-कोल्हापूरसह राज्यातील सर्वच रस्ते त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे टोलमुक्त करावेत, असे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, सरकारने निवडणुकीत लोकांसमोर सवंग लोकप्रियतेसाठी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. घोषणा करणे सोपे असते, त्याची अंमलबजावणी करताना कस लागतो. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. अशी स्थिती असतानाच सरकारने अनेक घोषणा केल्या. आर्थिक डोलारा सांभाळताना ते आता अडचणीत सापडले आहेत. सरकारची सध्याची अवस्थाच दोलायमान झाली आहे.
सध्याचा टोलमुक्तीचा निर्णय हा केवळ छोट्या रस्त्यांपुरता मर्यादित आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली असली तरी, प्रत्यक्षात संपूर्ण टोलमुक्तीची घोषणा त्यांनी केल्यामुळे ती त्यांनी पाळली पाहिजे. सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच असला पाहिजे. कोल्हापूरबाबतही आमची तीच स्पष्ट भूमिका आहे. महामार्गांचे ठेके राष्ट्रवादीच्या लोकांकडे आहेत, अशी टीका केली जात आहे. वास्तविक अशा सर्वच ठेक्यांची कागदपत्रे तपासावीत. आम्हालाही कळू द्या, कोणाचे ठेके आहेत ते, असेही ते म्हणाले.
आरक्षणाबाबत ते म्हणाले की, सरकारने धनगर समाजाबाबत अन्याय केला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या प्रस्तावावर अनुकूल निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या एका पत्राला केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून या गोष्टी समोर आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळलेला नाही. मराठा व अन्य समाजाचे आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न तसेच आहेत. त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
(प्रतिनिधी)
भूविकास बँका टिकल्या पाहिजेत
राज्यातील भूविकास बँका टिकल्या पाहिजेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या बॅँका असल्यामुळे सरकारने त्यांना मदत करणे अपेक्षित होते. आर्थिक मदत देऊन भूविकास बॅँका टिकविण्याची गरज आहे. आघाडी सरकारच्या काळात भूविकास बॅँकांबाबत केवळ समिती नियुक्त करून त्याची चर्चा सुरू होती, तेव्हा भाजपच्या लोकांनी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे या बॅँका टिकविण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घ्यावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.