संध्यामठला हरवून ‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत--अवधूत घारगे स्मृती
By Admin | Updated: February 10, 2015 23:50 IST2015-02-10T23:25:01+5:302015-02-10T23:50:29+5:30
फुटबॉल चषक स्पर्धा

संध्यामठला हरवून ‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत--अवधूत घारगे स्मृती
कोल्हापूर : अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सचिन गायकवाडने केलेल्या एकमेव गोलवर बालगोपाल तालीम मंडळाने उपांत्य फेरीत धडक मारली. बालगोपाल तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर १-० गोलफरकाने मात केली. सामन्यातील लढवय्या खेळाडू म्हणून संध्यामठच्या अश्विन टाकळकर याला गौरविण्यात आले.
शाहू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये सामना झाला. दोन्ही संघांनी प्रारंभापासून खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. बालगोपाल तालीम मंडळाकडून बबलू नाईक, हरीश पाटील, अक्षय मंडलिक, युवराज कुरणे; तर संध्यामठ तरुण मंडळाकडून अभिजित सुतार, आशिष पाटील, अजिंक्य गुजर, अमोल पाटील, अश्विन टाकळकर यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता.
उत्तरार्धात बालगोपाल तालीम मंडळाने अधिकच आक्रमक पवित्रा घेत गोल करण्यासाठी सतत खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. यामध्ये बालगोपाल तालीम मंडळाच्या श्रेयस मोरेच्या पासवर सचिन गायकवाडने हेडद्वारे गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर बालगोपाल तालीम मंडळाकडून आघाडी भक्कम करण्यासाठी, तर संध्यामठ तरुण मंडळाकडून खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांनाही गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने १ -० गोलफरकाने विजय मिळविला.
आजचा सामना : शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, दुपारी ४ वा.