संदीप दिवाण, मनीषा दुबले यांची कोल्हापुरात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:08+5:302021-09-10T04:31:08+5:30
कोल्हापूर : गुन्हे अन्वषेण (सीआयडी) कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी मनीषा भीमराव दुबले यांची, तर राज्य राखीव बलच्या कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी ...

संदीप दिवाण, मनीषा दुबले यांची कोल्हापुरात बदली
कोल्हापूर : गुन्हे अन्वषेण (सीआयडी) कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी मनीषा भीमराव दुबले यांची, तर राज्य राखीव बलच्या कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी संदीप दिवाण यांची बदली झाली आहे. मूळचे सरुड (ता. शाहूवाडी) चे रहिवासी असलेले पी. आर. पाटील यांची कोल्हापूर नागरी हक्क संरक्षण विभागातून येथून नंदुरबार पोलीस अधीक्षकपदावर बदली झाली आहे. राज्यातील आयपीएस पोलीस अधीक्षक अशा ८५ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश गुरुवारी गृह विभागाच्यावतीने निघाले.
बदली झालेले पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक पुढीलप्रमाणे (कंसातील जुने ठिकाण) : दिनेश बारी - बृन्हमुंबई (गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर), संदीप दिवाण- राज्य राखीव पोलीस बल, समादेशक, कोल्हापूर (पुणे, आर्थिक गुन्हे शाखा), मनीषा दुबुले- गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर (सांगली), पी.आर. पाटील - नंदुरबार (नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर). याशिवाय यापूर्वी कोल्हापुरात कारकीर्द गाजवलेले शहाजी उमाप यांची मुंबईहून नाशिक ग्रामीणला पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. कोल्हापुरात बदली झालेले संदीप दिवाण यांनी यापूर्वी कोल्हापुरात अपर पोलीस अधीक्षकपदी सेवा बजावली आहे, तर त्यांचे मूळ गाव मांगले (ता. शिराळा, जि. सांगली) आहे.
पद्मा कदम विटा येथे, तर रवींद्र साळोखे यांची शाहूवाडी उपअधीक्षकपदी बदली
राज्यातील ९२ पोलीस उपअधीक्षकांच्या गुरुवारी बदल्यांचे आदेश निघाले. कोल्हापुरातील आर्थिक गुन्हा शाखेच्या पद्मा कदम यांची विटा (सांगली) येथे, तर गणेश इंगळे यांची गडहिंग्लजहून बारामती येथे बदली झाली आहे. निवृत्त होत असलेल्या करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या जागी गडचिरोलीहून संकेत जोशी, तर कोल्हापूरचे सुपुत्र रवींद्र साळोखे यांची औरंगाबादहून शाहूवाडी येथे बदली झाली. लातूर येथून राजीव नवले यांची गडहिंग्लज येथे, तर प्रिया पाटील यांची लातूरहून पोलीस मुख्यालयात बदली झाली. याशिवाय शशिकांत शिंदे यांची मालेगाव येथून कोल्हापूर जिल्हा जातपडताळणी समिती येथे बदली झाली आहे.