वाळूशिल्पांनी किनारा सजणार
By Admin | Updated: April 26, 2017 23:55 IST2017-04-26T23:55:33+5:302017-04-26T23:55:33+5:30
पर्यटकांना खास आकर्षण : पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

वाळूशिल्पांनी किनारा सजणार
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात २८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दोन्ही पर्यटन महोत्सवांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मांडवी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी मांडवी समुद्र किनाऱ्यावर विविध प्रकारची वाळूशिल्प बनविण्याचे काम जोरात आहे. वाळूशिल्प बनविण्याची चाचणी घेतली जात असून, त्यात अनेकजण सहभागी होत आहेत. मांडवी महोत्सवात साकारली जाणारी वाळूशिल्प पर्यटक व रत्नागिरीकरांसाठी आकर्षण ठरणार आहेत.
शहरातील मांडवी बंदर हे रत्नागिरीचे गेटवे म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी थेट समुद्रात पाचशे मीटर लांबपर्यंत उभारलेल्या जेटीवर जाऊन समुद्राच्या अथांगतेचा, जेटीला धडका मारणाऱ्या लाटांचा थरार अनुभवता येतो. या जेटीच्या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन महोत्सवाच्या काळात होणार आहे. मांडवीला क वर्ग पर्यटन केंद्र म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, या पर्यटन केंद्राला ब दर्जा मिळावा, ही येथील जनतेची मागणी आहे. त्यासाठीच येथे पर्यटनाच्या सुविधा कायमस्वरुपी उभारण्यात येणार असून, त्यात स्थानिक व मांडवी पर्यटन संस्थेने पुढाकार घेतला आहे. हा महोत्सव हा पर्यटन वाढीसाठी वातावरण निर्मिती करणार आहे. (प्रतिनिधी)
मासेमारीचा थरार
पर्यटकांसाठी मांडवी येथे मासेमारी कशाप्रकारे केली जाते याचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. त्यामुळे या होड्या, लॉँचेसमधून प्रत्यक्ष मासेमारी करण्याचा थरारक अनुभवही अनेक पर्यटकांना घेता येणार आहे. त्याबाबतची तयारीही आयोजकांनी पूर्ण केली आहे. लॉँचने समुद्रात जाऊन जाळी टाकून मासे कसे पकडले जातात याचे हे प्रात्यक्षिक असणार आहे.
आम्ही रापणकर...
पारंपरिक मच्छीमारीचा अत्यंत आकर्षक व वेड लावणारा प्रकार म्हणचे रापण हा मासेमारी प्रकार. या प्रकाराची पर्यटकांनाही फारशी माहिती नाही. ही माहिती व्हावी म्हणून खास कार्यक्रमही येथे होणार आहे. रापणीचा शेवटचा जाळ्याचा भाग किनाऱ्यावर आल्यानंतर कमी पाण्यात जाळ्यामध्ये फडफडणारे जीवंत मासे पाहणे ही पर्वणीच ठरणार आहे.