वाळू उपसा करणारे तराफे पेटविले

By Admin | Updated: March 15, 2015 00:44 IST2015-03-15T00:42:43+5:302015-03-15T00:44:33+5:30

कूर परिसरातील घटना : भुदरगड तहसील विभागाची कारवाई

The sand straps are rampant | वाळू उपसा करणारे तराफे पेटविले

वाळू उपसा करणारे तराफे पेटविले

गारगोटी : कूर-मडिलगे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांची १७ तराफे भुदरगड तहसील विभागाने शनिवारी पेटवून दिली. मात्र, वाळू तस्करी करणारा एकही तस्कर किंवा वाहन तहसील विभागाच्या हाती लागले नाही. कूर येथे १६, तर वाघापूर येथे एक तराफा पेटविण्यात आला.
तालुक्यातील कूर, वाघापूर, कोनवडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेदगंगा नदीपात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा राजरोजसपणे उपसा सुरू आहे. या वाळू तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत यांनी तक्रारी केल्या. मात्र, हे तस्करी करणारे थांबले नाहीत. यापूर्वी तहसील विभागानेही एकवेळ कारवाई केली होती. पण, याचा कोणताही परिणाम या वाळू तस्करांवर झाला नाही. नदीपात्रात पाणी असतानासुद्धा लाकडी तराफ्यांना ट््युब बसवून दिवसरात्र वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे अनेक तक्रारी ग्रामस्थ ग्रामपंचायत व तहसील विभागाकडे करीत होते.
या तक्रारींची दखल घेत शनिवारी दुपारी तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. मात्र, पथक नदीवर पोहोचण्यापूर्वीच वाळू तस्करांनी धूम ठोकली. त्यामुळे या पथकाने वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे पेटवून दिली.
पेटवून दिलेल्या तराफ्यांची एकत्रित किंमत सुमारे एक लाखापेक्षा अधिक आहे. कारवाईत तहसीलदार शिल्पा ओसवाल, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, सर्कल बी. डी. बुजरे, डी. बी. टिपुगडे, पी. डी. झंजे, श्रीकांत भोसले, श्रीनिवास जाधव, व्ही. एन. पाटील यांनी सहभाग घेतला. दिवसा वाळू उपसा; रात्री तर्र...
वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये १८ ते २३ वर्ष वयोगटांतील तरुणांचा समावेश आहे. दिवसभर वाळू उपसा करून रात्री दारूच्या नशेत तर्र... झालेले हे तरुण पाहायला मिळतात. या तरुणांच्या घरातील पालकांच्याही वाळू उपसा करण्याबद्दल तक्रारी आहेत; पण सायंकाळी दारूच्या नशेसाठी हे तरुण पालकांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तहसील विभागाने पुन्हा वाळू तस्करी होऊ नये यासाठी दक्ष राहण्याची गरज असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The sand straps are rampant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.