वाळू तस्करांकडून मंडल अधिकाऱ्यांना मारहाण
By Admin | Updated: January 2, 2015 00:58 IST2015-01-02T00:50:11+5:302015-01-02T00:58:04+5:30
इंगळीत जमावाकडून प्रकार : तलाठी कार्यालयाची मोडतोड; तलाठ्यांनाही चोप

वाळू तस्करांकडून मंडल अधिकाऱ्यांना मारहाण
हुपरी : रॉयल्टी न भरता वाळू वाहतूक करणारा ट्रक अडविल्याच्या कारणावरून इंगळी (ता. हातकणंगले) येथील संतप्त ग्रामस्थांनी रुई सज्जाचे मंडल अधिकारी सतीश शिंदे व पट्टणकोडोलीचे गावकामगार तलाठी गजानन माळी यांना बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने तलाठी कार्यालयाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली.
दरम्यान, याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कार्यालयाची मोडतोड करून अधिकाऱ्यांना मारहाण करणे, अशा प्रकारचे गुन्हे ट्रकचालक सागर मधुकर घोरपडे (रा. नृसिंहवाडी) याच्यासह अकराजणांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.
त्यामध्ये कुबेर चौगुले, अमर चौगुले, पोपट चौगुले, श्रीमंधर चौगुले, नागेश मगदूम, देवगोंडा मगदूम, गणेश मगदूम, सुनील चौगुले, अमित चौगुले, समीर चौगुले यांचा समावेश आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी सतीश शिंदे यांनी हुपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांतून समजलेली माहिती अशी, इंगळी येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी लागणारी वाळू अवैधरीत्या ट्रकमधून आणण्यात येत होती. आज, गुरुवारी दुपारी हा ट्रक मंडल अधिकारी शिंदे व तलाठी गजानन माळी यांनी अडवला. यावेळी वाळू वाहतुकीचा परवाना, वाळूची रॉयल्टी भरल्याची कागदपत्रे तपासण्यासाठी मागितली असता ट्रकचालक सागर घोरपडे याने दिली नाहीत. त्यामुळे ट्रक जप्त केला. याबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू असताना वादावादी झाली. परिणामी, संतप्त जमावाने या दोघांना मारहाण करीत तलाठी कार्यालयावर हल्ला केला व कार्यालयातील साहित्यांची मोडतोड केली. (प्रतिनिधी)
अकराजणांवर गुन्हे दाखल
या घटनेची माहिती तहसीलदार दीपक शिंदे यांना समजताच ते घटनास्थळी आले. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्याबाबत हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार अकराजणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले.