तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी द्या

By Admin | Updated: December 12, 2014 00:06 IST2014-12-12T00:04:48+5:302014-12-12T00:06:09+5:30

नगरसेवकांची मागणी : नगरविकास मंत्र्यांना साकडे

Sanction the Pilgrimage Plan | तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी द्या

तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी द्या

कोल्हापूर : महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून अंमलबजावणी करा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज, गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी केंद्रीय मंत्री नायडू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आराखडा राबविण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती खा. महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
थेट पाईपलाईन योजना सुरू होणारे वर्ष व निधी उपलब्ध झालेले वर्ष यामध्ये फरक पडल्याने महापालिकेवर अतिरिक्त ६० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून ही अतिरिक्त रक्कम महापालिकेला द्यावी. त्यामुळे योजना पूर्णत्वास नेणे सोपे जाणार आहे, अशी नगरसेवकांनी नायडू यांना विनंती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या कोल्हापूरला तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यास केंद्र शासन कटिबद्ध आहे. अंतर्गत रस्ते, तसेच पाईपलाईन योजनेतील निधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे नायडू यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे पत्रकात म्हटले आहे. यावेळी महापौर तृप्ती माळवी, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, कादंबरी कवाळे, ज्योत्स्ना पवार-मेढे, विनायक फाळके, प्रकाश गवंडी, प्रभाताई टिपुगडे, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, महेश सावंत, आदी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sanction the Pilgrimage Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.