कोल्हापुरात दुपारनंतर रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:26+5:302021-04-22T04:23:26+5:30

कोल्हापूर : भाजी मंडईसह सर्व अत्यावश्यक सेवा फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कोल्हापुरात बुधवारी दुपारनंतर सर्व व्यवहार ...

Samsum on the road in the afternoon in Kolhapur | कोल्हापुरात दुपारनंतर रस्त्यावर सामसूम

कोल्हापुरात दुपारनंतर रस्त्यावर सामसूम

कोल्हापूर : भाजी मंडईसह सर्व अत्यावश्यक सेवा फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कोल्हापुरात बुधवारी दुपारनंतर सर्व व्यवहार बंद झाले, परिणामी शहरातील सर्व रस्ते सामसूम झाले. पोलीस आणि महानगरपालिका पथकांनी सकाळी अकरानंतर सक्रिय होत सर्वच रस्त्यांवर फिरून अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यास भाग पाडले.

कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत चालला असून रुग्ण संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे दि. १५ एप्रिलपासून राज्यातील संचारबंदी काळातील नियम अधिक कडक केले होते. केवळ भाजी मार्केटसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या निमित्ताने पुन्हा मोठी गर्दी व्हायला लागली होती.

बाजारपेठेत गर्दी वाढत गेल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिकच वाढला, तसेच बाजारपेठेत फिरणारे नागरिक, भाजी विक्रेते कोरोनाबाधित असूनही राजरोसपणे फिरत असल्याचे ॲन्टिजेन चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले. कडक निर्बंध लादूनही रुग्ण वाढत आहेत म्हटल्यावर राज्य सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजी मंडई सकाळच्या सत्रात फक्त सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरातील चित्र ‘सकाळी गर्दी आणि दुपारनंतर सामसूम’ असेच होते.

सकाळी कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, रेल्वे फाटक, राजारामपुरी, पंचगंगा नदी घाट, कसबा बावडा येथे भरणाऱ्या नियमित भाजी मंडईत तसेच सानेगुरुजी, रायगड कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरातील रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बेकरी, खाद्यपदार्थांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी असे चित्र होते. दुपारी बारा वाजले तरी व्यवहार सुरूच राहिले. त्यानंतर मात्र महापालिका पथकांच्या तसेच पोलिसांच्या गाड्या शहरातून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करीत फिरायला लागल्या. या पथकांनी अर्ध्या तासात सर्व व्यवहार बंद केले.

फक्त पेट्रोल पंप सुरू -

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद झाल्यामुळे शहरात खऱ्या अर्थाने संचारबंदी असल्याचे जाणवले. काही हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी पार्सल सुविधा सुरू ठेवल्या होत्या. औषध दुकाने आणि पेट्रोल पंप सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून वडाप रिक्षा सुरू होत्या, त्याही बंद झाल्या. रस्त्यावरील वाहनांची गर्दी रोडावली. दुपारी दोननंतर तर सर्वच रस्ते अक्षरश: ओस पडले. केवळ रुग्णवाहिका आणि त्यांच्या सायरनचा आवाजच पाहायला मिळाला.

Web Title: Samsum on the road in the afternoon in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.