प्रचारात समरजित यांची आघाडी
By Admin | Updated: February 17, 2017 01:04 IST2017-02-17T01:04:29+5:302017-02-17T01:04:29+5:30
४० हून अधिक बैठका : नवोदिता घाटगेंनीही कागल पिंजून काढले

प्रचारात समरजित यांची आघाडी
कोल्हापूर : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत कागल तालुक्यात ‘शाहू’ साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रचारसभा व गटांच्या बैठकी घेण्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिक सभा व त्यापेक्षा दुप्पट गटांच्या बैठका घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनीही तालुका पिंजून काढत थेट महिला वर्गाशी संपर्क साधल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे.
कागल तालुक्यात आतापर्यंत घाटगे गटाने अनेक निवडणुका लढविल्या. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हे सक्रिय राजकारणात होते, त्यावेळी राजकारणाचा रंग काहीसा वेगळा होता. दोन गटांतच निवडणूक होत असल्याने फारशी ताणाताण करावी लागत नव्हती; पण सध्याच्या राजकारणात विकासकामांबरोबर संपर्कालाही महत्त्व आल्याने निवडणुकांची शैलीही बदलली आहे.
प्रत्येक राजकीय पक्षात कोणतीही निवडणूक असू दे, उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत असतो. तो मिटविण्यात नेत्यांची निम्मी ताकद खर्च होते. त्यानंतर सभा, बैठका सुरू होतात. पण, समरजितसिंह घाटगे यांनी १४ डिसेंबरपासून सभा व बैठकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. दोन-तीन गावांचा एक मोठा मेळावा घेत आपली भूमिका व विकासाचे व्हिजन लोकांना समजावून सांगण्यावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघनिहाय इच्छुकांचा अंदाज घेत सक्षम उमेदवारांचा शोध घेतला. त्यानंतर १७ जानेवारी ते १२ फेबु्रवारी या कालावधीत त्यांनी दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सभांचा धडाकाच लावला. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनी दुसऱ्या बाजूने हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढविला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह इतर पक्षांनी गेले तीन महिने प्रचार यंत्रणा राबविलेली दिसत नाही. आतापर्यंत ४० हून अधिक सभा घेऊन प्रत्येक मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. कागल तालुक्यासारखी राजकीय ईर्षा कोठेही पाहावयास मिळत नाही, हे जरी खरे असले तरी नेत्यांची राबणूक व व्हिजन हेही तिथेच पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)
टीकाटिप्पणीला फाटा...
जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी टोकाची टीका सुरू होते; पण समरजितसिंह यांनी टीकाटिप्पणीला फाटा देत भाजप सरकारची ध्येयधोरणे व विकास यांवरच आपल्या भाषणात भर दिल्याचे दिसते.
रोज चौदा तास मतदारसंघात!
समरजितसिंह घाटगे यांचा सकाळी आठ वाजल्यापासून मतदारसंघातील दौरा सुरू होतो. सकाळच्या टप्प्यात तीन-चार गावांत जाऊन बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते. एखाद्या गावातच दुपारचे जेवण करून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होऊन रात्री दहापर्यंत ते मतदारसंघातच असतात.