समीर मुल्लाणी यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव-
By Admin | Updated: August 29, 2015 00:02 IST2015-08-29T00:02:23+5:302015-08-29T00:02:23+5:30
आदर्श शिक्षक

समीर मुल्लाणी यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव-
राजाराम कांबळे- मलकापूर विद्यामंदिर शित्तूर वारूण येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक समीर मुल्लाणी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावासमीर मुल्लाणी यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव (ता. वाळवा) येथे झाले. आष्टा येथे रयत शिक्षण संस्थेच्या डी. एड्. कॉलेजमध्ये डी. एड्.पूर्ण करून आदर्श बालकमंदिर शिराळा येथे विनाअनुदानित संस्थेत १९९५ मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण विभागात १९९५ ला अध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी शाहूवाडीसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील शिरगाव, ऐतवडी, चनवाड, व शित्तूर-वारूण या प्राथमिक शाळेत सेवा बजावली. तालुक्यात त्यांनी २0 वर्षे सेवा केली. सर्वांत जास्त काळ सेवा त्यांची विद्यामंदिर, चनवाड या शाळेत झाली. या शाळेत त्यांची पत्नी नूरजहाँ मुल्लाणी या देखील सेवेत होत्या. त्यांच्या पत्नी नूरजहाँ मुल्लाणी यांना बी.एड्.च्या राज्य पातळीवरील विद्यापीठ राज्यपाल पुरस्कार व बेस्ट अवॉर्ड मिळाले आहे.चनवाड प्राथमिक शाळेला जयपूर, दिल्ली, उस्मानाबाद, कऱ्हाड, आदी ठिकाणांच्या कमिट्यांनी भेट देऊन शाळेचा गौरव केला. समीर मुल्लाण्णी यांनी आपल्या सेवाकाळात सामाजिक बांधीलकी मानून सेवा बजाविली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवला. माझे आई-वडील, पत्नी नूरजहाँ मुल्लाणी व सहकारी शिक्षकांचे सहकार्य, निष्ठेने, प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच पुरस्कार मिळाल्याचे समीर मुल्लाणी सांगतात.
पुरस्कार व सन्मान
आतापर्यंत त्यांना विविध संस्थांचे दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २0१४-१५ या वर्षासाठी शाहूवाडी तालुक्यातून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. एकाच वर्षात जिल्हा व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे ते एकमेव शिक्षक आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील शंकर सणगर यांना १९६७ साली पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. शामराव खडके यांना दुसरा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आठ वर्षांनंतर सर्वांत कमी वयाच्या समीर मुल्लाणी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मुल्लाणी यांनी राबविलेले उपक्रम
चनवाड शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग राबविले. एल.सी.डी. प्रोेजेक्टर अध्यापन, औषधी वनस्पती लागवड, गांडूळ खत निर्मिती, सौर अभ्यासिका, आधुनिक साधनाद्वारे ई-लर्निंग, घनकचरा व्यवस्थापन, आॅक्सिजन पार्क, बाल वाचनालय, डिजिटल वर्ग, सुंदर बाग, आदी उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांमुळेच चनवाड शाळेला गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. लोकसहभागातून चार लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला. त्यांना ‘स्वच्छ सुंदर हिरवी शाळा’ पुरस्कार मिळाला.