समीर, अक्षयची आगेकूच
By Admin | Updated: May 12, 2015 23:43 IST2015-05-12T22:06:33+5:302015-05-12T23:43:12+5:30
फिडे बुध्दिबळ स्पर्धा : दुसऱ्या फेरीअखेर ऋचा, स्वाती यांचीही आघाडी

समीर, अक्षयची आगेकूच
सांगली : नूतन बुध्दिबळ मंडळाच्यावतीने येथे सुरू असलेल्या फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत मंगळवारच्या दुसऱ्या फेरीअखेर समीर कठमाळे, अक्षय शेगावकर, पृथु देशपांडे, सोहन फडके, ऋचा पुजारी, समीर इनामदार, स्वाती मोहतो आदी ४६ खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत संयुक्तपणे प्रथम स्थानाकडे वाटचाल सुरू केली. अभिजित जोशी, सारंग पोंक्षे, सईश आडी, अबिद अली मुजावर, कशिश जैन आदी २२ खेळाडू दीड गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
स्पर्धेची मंगळवारी दुसरी फेरी झाली. सांगलीच्या समीर कठमाळेने ग्रिष्मा अशरचा २७ व्या चालीला पराभव केला. कोल्हापूरच्या फिडेमास्टर ऋचा पुजारीने चिंतामणी जोशी याचा २३ व्या चालीला पराभूत केले. प. बंगालच्या फिडेमास्टर स्वाती मोहता हिने सांगलीचा सदानंद चोथे याला ३२ व्या चालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
पहिल्या फेरीत पुण्याचा सोहन फडके, औरंगाबादची ऋतुजा बक्षी, सारंग पोंक्षे, गोव्याची अमेय आडी, पुण्याचा अभय जोशी, सोहम दातार, इचलकरंजीचा रवींद्र निकम, औरंगाबादचा निशीत सिंग, मुंबईची जान्हवी सोनजी, सातारचा ओंकार कडव आदी १०४ खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. दुसऱ्या फेरीत ४६ खेळाडूंनी २ गुणांची कमाई करून आघाडी घेतली आहे. २२ खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत डाव बरोबरीत सुटल्याने त्यांची १.५ गुणाची कमाई झाली असून, ते दुसऱ्या स्थानावर आहेत. (प्रतिनिधी)