संभाजीराजेंची राष्ट्रपतींशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:35 IST2016-09-08T00:35:09+5:302016-09-08T00:35:24+5:30
त्यांना राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ भेट दिला.

संभाजीराजेंची राष्ट्रपतींशी भेट
कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन विविध राष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. भेटीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना डॉ. जयसिंगराव पवार लिखित इंग्रजीतील ‘राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ’ भेट दिला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राष्ट्रहिताचे व समाजहिताचे कार्य सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विविध माध्यमांतून समाजातील घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि यामध्ये आपण स्वत: लक्ष घालावे, अशी इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केली. या चरित्रग्रंथात राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी केलेली मदत या विषयांचा प्रामुख्याने उल्लेख आहे, हे आपण आवर्जून वाचावे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या ग्रंथाचे आपण जरूर वाचन करू, असे नमूद केले.
युवराज संभाजीराजे यांनी बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ भेट दिला.