संभाजीराजेच एक नंबरचे खासदार
By Admin | Updated: September 3, 2016 00:56 IST2016-09-03T00:53:14+5:302016-09-03T00:56:34+5:30
सतेज पाटील यांनी केले कौतुक : कोणी किती प्रश्न विचारले हे गौण, जनतेचे प्रश्न सोडवा

संभाजीराजेच एक नंबरचे खासदार
कोल्हापूर : संभाजीराजे, कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील खरे एक नंबरचे खासदार तुम्हीच आहात... कोण किती प्रश्न विचारते, यापेक्षा तुम्ही कोल्हापूरचे आणि जनतेचे प्रश्न सोडवणार याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या रूपाने कोल्हापूरचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी कोल्हापूरला हक्काचा खासदार मिळाला आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे शुक्रवारी कौतुक केले. निमित्त होते, एसपीएन डिजिटल नेटवर्कच्या विधायक गणेश बक्षीस वितरण समारंभाचे. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, ऋतुराज पाटील, करवीरच्या सभापती स्मिता गवळी, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, विनय नलावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे व आमदार सतेज पाटील यांच्यात सलोखा वाढला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी दिले होते व ‘एसपीएन’च्या गणेशोत्सव बक्षीस समारंभात हे दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याने काहीतरी राजकीय टीकाटिप्पणी होणार असे म्हटले होते. घडलेही तसेच. सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘मी गृहराज्यमंत्री असताना मराठवाड्यात दौऱ्यावर होतो. त्यावेळी शासकीय विश्रामधामावर लोकांची गर्दी होती. त्यांना का थांबलाय म्हटल्यावर आम्ही संभाजीराजेंना भेटण्यासाठी थांबल्याचे ते सांगत होते. त्यावरून तुमची लोकप्रियता राज्यभर असल्याचे समजून आले. खासदार म्हणून कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्याची तुमच्यावर जबाबदारी आली आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा. त्यासाठी आमचेही पाठबळ तुमच्यामागे असेल. तुम्ही चांगले काम करून दाखवाल व शिव-शाहूंच्या गादीचा आदर राखाल याचा नक्की विश्वास वाटतो.’
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘माझी आणि सतेज पाटील यांची शाळेपासूनची दोस्ती आहे.’ खासदार झाल्यावर पहिल्यांदा वाड्यावर सत्कारासाठी बंटी पाटीलच आले. मी जास्त बोलण्यापेक्षा काम करून दाखविण्यास प्राधान्य देणार आहे. रायगडावरील शिवराज्यभिषेकातील टाळ्यांचा आवाज दिल्लीत पोहोचला. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. आज या कार्यक्रमात माझ्या भाषणाला शिट्ट्यांची दाद मिळाली, हा योग पहिल्यांदाच आलाय आणि मला याचा आनंद वाटतोय.’
डॉल्बी म्हणजे भयानक रोग...
गणेशोत्सव हा सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र यावे म्हणून साजरा केला जातो; पण, आता या गणेशोत्सवाला विघातक स्वरूप येत आहे. हे धोकादायक आहे. खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला
दिशा देण्याचे काम थोर व्यक्तींंनी केले. मात्र, आज डॉल्बी हा एक भयानक रोग लागला असल्याचे व तो वेळीच रोखण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
जनतेची शिट्टी महत्त्वाची
खासदार संभाजीराजे यांचे भाषण सुरू असताना शिट्ट्या वाजू लागल्या. त्याचा संदर्भ घेऊन संभाजीराजे म्हणाले, ‘मला परवाच्या कार्यक्रमात शिट्ट्याच ऐकायला मिळाल्या नाहीत.
मात्र, आजच्या कार्यक्रमात शिट्ट्याच शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत. मला स्वत:ला
शिट्टी वाजवता येत नाही; पण मला
पुढाऱ्यांच्या शिट्ट्यांपेक्षा जनतेची शिट्टी
महत्त्वाची वाटते आहे.
संभाजीराजेंच्या या विधानावर सभागृहातून पुन्हा जोरदार टाळ्या व शिट्ट्या वाजल्या. त्यानंतर कार्यक्रमस्थळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिट्टी वाजविण्याच्या स्टाईलची जोरदार चर्चा रंगली.