‘महाराष्ट्र भूषण’बद्दल संभाजी बिग्रेडचे आंदोलन
By Admin | Updated: August 19, 2015 23:16 IST2015-08-19T23:16:45+5:302015-08-19T23:16:45+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेकवेळी कार्यकर्ते ताब्यात

‘महाराष्ट्र भूषण’बद्दल संभाजी बिग्रेडचे आंदोलन
कोल्हापूर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी बिग्रेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना बुधवारी सकाळी निवेदन दिले. दरम्यान, सायंकाळी पुरस्कार वितरण केल्याच्या निषेर्धात शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक करताना बिग्रेडच्या नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातून छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना जाहीर केलेला पुरस्कार वितरीत करू नये, याकरीता संभाजी बिग्रेडच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने बुधवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन दिले. यामध्ये शासनाने समाज भावना समजून हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, बाजीराव दिंडे, विजयकुमार पाटील, सुनील पाटील, शिवाजी खोत, विकास जाधव, हणमंत पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी राज्य शासनाने राजभवनात हा पुरस्कार वितरीत केल्याच्या निषेर्धात शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक करताना बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संपत चव्हाण, कुलदीप खुटाळे, सुनील पाटील, संदीप भोसले, नागेश गायकवाड, विकास पोवार, निहाल खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी सकाळी बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारास विरोध म्हणून ताराराणी चौकात अज्ञात तरुणांनी टायर पेटविले होते तर काही वेळाने राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या तावडे हॉटेलजवळून गांधीनगरकडे जाणाऱ्या के.एम.टी.बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत के.एम.टी.बसचे किरकोळ नुकसान झाले.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात एकत्र जमून निदर्शने केली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अनिकेत अरुण सावंत (वय ३१, रा. शिवाजी पेठ), नीलेश शामराव चव्हाण (३३, रा. शिवाजी पेठ), नंदकिशोर विजय सुर्वे (३७, रा. साने गुरुजी वसाहत), चंद्रकांत दिनकर पाटील (५३, रा. जुना वाशीनाका), आदी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.