पैरा फेडण्याच्या गल्लीतल्या धमक्यांना घाबरत नाही समरजित घाटगे यांचे प्रत्युतर : माझ्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:52+5:302021-09-14T04:28:52+5:30
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझे नाव घेऊन पैरा फेडण्याची धमकी दिली आहे. परंतु अश्या गल्लीतल्या धमक्यांना ...

पैरा फेडण्याच्या गल्लीतल्या धमक्यांना घाबरत नाही समरजित घाटगे यांचे प्रत्युतर : माझ्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझे नाव घेऊन पैरा फेडण्याची धमकी दिली आहे. परंतु अश्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस व विक्रमसिंह घाटगे यांचा चिरंजीव आहे. जर घाबरत असतो तर तुमच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून नव्वद हजार मते मिळवली नसती असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमवारी सायंकाळी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले.
मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यावर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत त्यांना समरजित घाटगे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिल्याचा आरोप केला. त्यास उत्तर देताना घाटगे म्हणतात, सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना थेट उत्तर न देता त्यांनी माझे व चंद्रकांत दादा यांचे नाव घेऊन राजकारण केले आहे. सोमय्या यांना मी कधीही भेटलेलो नाही. त्यामुळे या आरोपाशी माझा काडीमात्र संबंध नाही. मुश्रीफ यांच्यावर केलेल्या त्या आरोपांच्या बाबतीत मी अनभिज्ञ होतो. मलाही ते माध्यमांमधूनच समजले. त्यामुळे माझे नाव घेणे हा मुश्रीफ यांच्या राजकारणाचा भाग आहे, असे राजकारण करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत आणि या पुढेही आम्ही तसे करणार नाही. या विषयाला त्यांनी राजकीय वळण देऊ नये. माझा काडीचाही संबंध नसताना त्यांनी माझे नाव घेतले आहे. याचा अर्थ माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही. कागलमधील कुजबूजसंदर्भात ते जे बोलत आहेत. तसे असते तर कुस्तीची पत्रकार परिषद सोमवारी घेतली नसती.
मानहानी व हत्तीवरून मिरवणूक...
मानहानीचा दावा आणि हत्तीवरून मिरवणूक ही त्यांची कायमची वक्तव्ये आहेत ते तपासण्यासाठी स्वतंत्र खंडपीठ काढावे लागेल असाही उपहासात्मक टोला घाटगे यांनी लगावला.