समरजित घाटगे वैचारिक विरोधक, शत्रू नव्हेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:04+5:302021-02-21T04:48:04+5:30
कागल : राजर्षी शाहू महाराज, बापूसाहेब महाराज, बाळ महाराज विक्रमसिंहराजे घाटगे यांनी आयुष्यभर समता आणि पुरोगामित्वाचे ...

समरजित घाटगे वैचारिक विरोधक, शत्रू नव्हेत
कागल : राजर्षी शाहू महाराज, बापूसाहेब महाराज, बाळ महाराज विक्रमसिंहराजे घाटगे यांनी आयुष्यभर समता आणि पुरोगामित्वाचे विचार जपले. दिनदलितांच्या कल्याणासाठी आपला खजिना ओतला. परंतु त्यांचे वारसदार मात्र पुरोगामित्व सोडून जातीयवाद्यांच्या पक्षात गेले आहेत. त्यांनी पुरोगामित्वाचे विचार सोडल्यामुळे ते आमचे विरोधक आहेत, शत्रू नाहीत, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे याचे नाव न घेता केले.
येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी मंत्री मुश्रीफ यांनी आमदार फंडातून पंधरा लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक रमेश माळी होत्या. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पुढच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेणारच असतील, तर मलाही त्यांचा पाईक म्हणून मदारी मेहतरचा जन्म मिळावा, अशी पार्थना आहे. यावेळी भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, रमेश माळी, सदासाखरचे संचालक इगल प्रभावळकर, कु. दीप्ती महांतेश स्वामी, कु. अन्विता सुनील कारंडे यांचीही भाषणे झाली. स्वागत नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार सौरभ पाटील यांनी मानले.
चौकट.
- राजर्षी शाहूंचाही पूर्णाकृती पुतळा उभारणार!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, खर्डेकर चौकात राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार आहे.. बाळ महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व बॅरिस्टर खर्डेकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करू. तसेच आपले दोन्ही गुरू स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचेही अर्धाकृती नव्हे, तर पूर्णाकृती पुतळे उभारणार आहे. त्यासाठी जागा कोणती निवडायची, हे नागरिकांशी चर्चा करून ठरवू.
फोटोओळी
कागल
- येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण कामाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, भैय्या माने आदी मान्यवर उपस्थित होते.