२६/११ च्या वीरांना सलाम
By Admin | Updated: November 27, 2015 01:05 IST2015-11-27T00:46:29+5:302015-11-27T01:05:07+5:30
शिवाजी विद्यापीठात कँडल मार्च : विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची शपथ

२६/११ च्या वीरांना सलाम
कोल्हापूर : तुमच्या अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही कधीच घाबरणार नाही, दहशतवादी तुम्ही कधीच जिंकणार नाही, अशा घोषणा देत मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या वीरांना गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून आदरांजली वाहिली. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी सात वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी सायंकाळी मुलींच्या वसतिगृहापासून कँडल मार्च काढत मुख्य इमारतीसमोर आले. इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या २६/११च्या रांगोळीभोवती मेणबत्या प्रज्वलित करीत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्तीची शपथ दिली, तर या देशाचा नागरिक म्हणून देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन, अशीही शपथ घेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकजुटीचे दर्शन घडविले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘भारत माता की जय’च्या घोषणाने परिसर दुमदुमला.
विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभाग व वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ए. आय. यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा, ए. आय. यू.चे सहसचिव सॅमसन डेव्हिड, सहसचिव वीणा भल्ला, डॉ. रमा देवी पाणी, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मास कम्युनिकेशनच्या समन्वयक डॉ. निशा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कँडल मार्च काढण्यात आला. याप्रसंगी विविध अधिविभागप्रमुख, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलींच्या वसतिगृहापासून कँडल मार्चला सुरुवात
मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळीभोवती मेणबत्या प्रज्वलित करीत शहिदांना श्रद्धांजली
याठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्तीची शपथ
विद्यार्थांनी एकजुटीचे घडविले दर्शन;‘ भारत माता की जय’च्या घोषणाने परिसर दुमदुमला