साळगाव सरपंच, उपसरपंच अडचणीत
By Admin | Updated: November 23, 2014 23:45 IST2014-11-23T21:58:55+5:302014-11-23T23:45:58+5:30
वृक्षतोडप्रकरण : पदे गमावण्याची शक्यता ?

साळगाव सरपंच, उपसरपंच अडचणीत
आजरा : ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरानातील २९ झाडे बेकायदेशीररित्या तोडली गेल्याने साळगाव येथील सरपंच नंदा केसरकर व उपसरपंच अरविंद गावडे यांच्यावर अपात्रतेची व दंडात्मक कारवाई होण्याच्या हालचाली तहसीलदारांकडून सुरू असून यामुळे दोघांचीही पदे अडचणीत आली आहेत.
साळगाव येथील गायरानातील २९ झाडे तोडल्याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करून संंबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी स्थळ पाहणी करून सत्यता पडताळणी केली. वृक्ष तोडले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर प्रती वृक्ष ९९० रूपयेप्रमाणे २०,७९० रूपये दंड भरण्याबाबतचे आदेश तहसीलदारांनी दिले. याचवेळी सदस्यांनी तहसीलदारांना लेखी पत्र देवून आपणाला कोणतीही सरपंच व उपसरपंचांनी कल्पना न देता ही वृक्षतोड झाली आहे असा पवित्रा घेतला.
या प्रकरणाची दखल तहसीलदार श्रीमती ठोकडे यांनी गांभीर्याने घेत सरपंच, उपसरपंचांवर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांना अपात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
तालुक्यात इको सेन्सीटीव्ह झोनमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड अन्यथा उत्खनन झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही तहसीलदार ठोकडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)