कागलमध्ये चार हजारांवर अर्जांची विक्री
By Admin | Updated: July 10, 2015 00:00 IST2015-07-10T00:00:22+5:302015-07-10T00:00:22+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींचा समावेश; तहसील कार्यालयावर गर्दी

कागलमध्ये चार हजारांवर अर्जांची विक्री
कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी येथील तहसील कार्यालयाजवळ मोठी गर्दी केल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत चार हजारांवर उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे, तर दि. ८ जुलैपर्यंत ४२४ जणांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. आज, शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, असे चित्र दिसत आहे.तालुक्यातील ८३ पैकी ५३ ग्रामपंचायतींच्या १८७ प्रभागांतून एकूण ५२८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार कार्यकर्ते, नेतेमंडळी, सूचक-अनुमोदक असा लवाजमा घेऊन तहसील कार्यालयात येत आहेत. अशीच गर्दी इंटरनेट कॅफे, महाईसेवा केंद्र यांच्या दारातही होत आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे. तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. तसेच बँकेचे नवीन पासबुक, कागदपत्रांची पूर्तता यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्तेही मेटाकुटीस आले आहेत.
तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या धान्य गोडावूनमध्ये निवडणूक विभाग आहे. तेथे प्रचंड गर्दी उसळली आहे. चोहोबाजूंनी या गोडावूनला माणसांचा वेढा पडल्यासारखे चित्र आहे, तर राखीव गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी विभागातून प्रस्ताव दाखल केल्याचे टोकण आणणे बंधनकारक केल्याने त्यांचीही धावपळ उडाली आहे. (प्रतिनिधी)+
शिरोळमध्ये ६१४ अर्ज दाखल
शिरोळ : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशीही सर्व्हर डाऊनमुळे इच्छुकांची दमछाक झाली. ५० टक्के महिला आरक्षणामुळे महिलांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. गुरुवारचा मुहूर्त साधत ६१४ जणांनी निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केले; तर ४४४ अर्जांची विक्री झाली. गुरुवारअखेर २३८८ अर्जांची विक्री झाली असून, ८१५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार व समर्थकांच्या मोटारसायकली, चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
गडहिंग्लजला सहाव्या दिवशी ४४७ अर्ज
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर दोन गावांत पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी ४४७ अर्ज दाखल झाले. गुरुवारअखेर एकूण ८३१ अर्ज दाखल झाले आहेत.