शिंदे यांच्यामुळेच ‘गडहिंग्लज’ बंद

By Admin | Updated: July 18, 2015 00:20 IST2015-07-17T23:51:54+5:302015-07-18T00:20:26+5:30

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप : श्रीपतराव शिंदेंच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करा

For the sake of Shinde, 'Gadhinglj' stopped | शिंदे यांच्यामुळेच ‘गडहिंग्लज’ बंद

शिंदे यांच्यामुळेच ‘गडहिंग्लज’ बंद

कागल : श्रीपतराव शिंदे यांच्यामुळेच गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडला होता. साखर कारखाना मोडल्यामुळेच जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आमदार मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य पार पाडत पुढाकार घेऊन सक्षम कंपनी आणून कारखाना सुरू केला. असे असताना श्रीपतराव शिंदेंनी गडहिंग्लज साखर कारखान्याची चौकशीची मागणी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा हा प्रकार असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंच्या कार्यकाळातील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैया माने, तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, विकास पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी निवेदन प्रसिद्धीस दिले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीपतराव शिंदेंच्या अध्यक्षपदाच्या काळात कारखाना डबघाईला आला होता. बिले न मिळाल्याने ऊस उत्पादकांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली होती. कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. कारखाना वाचविण्यासाठी त्यांच्या सहकारी संचालकांनाच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागला. कारखाना वाचविण्यासाठी त्यांची हकालपट्टी करावी लागली. त्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. हा त्यांचा गुन्हा आहे का? संपूर्ण साखर उद्योगच आज सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आला आहे. ब्रीक्स कंपनीच्या माध्यमातून आ. मुश्रीफ त्यातून निश्चितच मार्ग काढतील. मात्र, कारखाना मोडणारेच जाब विचारत आहेत, हे हास्यास्पद आणि घृणास्पद आहे. मुश्रीफसाहेबांच्या प्रयत्नानेच कारखाना वाचला, नाहीतर ‘दौलत’सारखी अवस्था झाली असती, हे जनता जाणून आहे. म्हणून श्रीपतराव शिंदेंच्याच चेअरमनपदातील कार्यकाळाची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. (प्रतिनिधी)
म्हणून चौथ्यांदा आमदार....
निवेदनात म्हटले आहे की, मुश्रीफसाहेबांनी कोणतेही ढोंग-सोंग-नाटक न करता प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठीच आपले आयुष्य झोकून दिल्यामुळे जनतेने त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. पोपटपंची भाषणबाजी न करता धडाडीने लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. या उलट जनतेने श्रीपतराव शिंदेंना म्हणूनच घरी बसविले आहे, अशी टीकाही निवेदनात केली आहे.

Web Title: For the sake of Shinde, 'Gadhinglj' stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.