‘केआयटी’ला ‘रिसर्च हब’ बनविणार : साजिद हुदली
By Admin | Updated: September 2, 2015 23:27 IST2015-09-02T21:23:31+5:302015-09-02T23:27:04+5:30
औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनुसार अभ्यासक्रमांची रचना करणार

‘केआयटी’ला ‘रिसर्च हब’ बनविणार : साजिद हुदली
संशोधन कार्य, विद्यार्थी केंद्रित व नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध विभागांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मानांकन मिळालेल्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने (केआयटी कॉलेज) ३३ वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. राज्यात द्वितीय स्थानी असलेल्या ‘केआयटी’ला विश्वस्त मंडळाचे मोठे पाठबळ आहे. या मंडळाची तीन वर्षांसाठी फेरनिवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘केआयटी’ची वाटचाल आणि भविष्यातील नियोजन, याबाबत सचिव साजिद हुदली यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : ‘केआयटी’ची स्थापना कशी झाली?
उत्तर : दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास ८० च्या दशकात मुंबई, पुण्याला जावे लागत होते. तेथील खर्च संबंधित विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असायचा. कोल्हापूर हे औद्योगिक विकासासाठी प्रसिद्ध असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि दर्जेदार अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाविद्यालय उभारण्याचा विचार काही उद्योजक-व्यावसायिकांनी केला, अशा संस्थेची स्थानिक उद्योजकांकडून देखील मागणी झाली होती. यात ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन, महंमदसाहेब हुदली, शिवाजीराव देसाई, डी. एस. पाटील, दादासाहेब चौगुले, भाऊसाहेब कुलकर्णी, एम. आर. पुंगावकर, आर्किटेक्ट प्रमोद बेरी, सी. बी. जोशी, अमरसिंह राणे यांनी पुढाकार घेऊन त्यादृष्टीने ‘एएमआयई कोचिंग क्लासेस’ची सुरुवात करून पहिले पाऊल टाकले. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून परवानगी दिली. त्यानंतर ‘केआयटी’ कॉलेजच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची १९८३ मध्ये सुरुवात झाली.
प्रश्न : आजपर्यंतची वाटचाल कशी झाली?
उत्तर : ‘सायबर’मधून १९८३ ला ‘केआयटी’ची सुरुवात झाली. त्यानंतर काही काळ शिवाजी उद्यमनगरमधील स्टेट बँकेच्या परिसरात ‘एएमआयई’ कोचिंग क्लासेसची सुरुवात झाली. यावेळी सिव्हिल इन्व्हार्मेंटल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉडक्शन या विद्याशाखांचे अभ्यासक्रम सुरू होते. यानंतर १९९१ मध्ये गोकुळ शिरगाव येथे ‘केआयटी’ने २७ एकर जागा घेतली. याठिकाणी प्रशस्त इमारतीत कॉलेज सुरू झाले. शिवाय कॉम्प्युटर, आयटी, मेकॅनिकल, ईएनटीसी आणि बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल आणि एमबीए, एम.एस्सी., एम.ई., आदी अभ्यासक्रम सुरू केले. सध्या विविध अभ्यासक्रमांतर्गत येथे सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वन केआयटी, मूडल, स्टुडंट्स प्लेसमेंट, विद्यार्थी-पालक-शिक्षक सुसंवाद, उद्योगजगताशी केलेले सामंजस्य करार, कन्सल्टन्सी, आदी उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही यशाचे अनेक टप्पे गाठले. ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन व ३.१२ सीजीपीएसह राज्यात द्वितीय क्रमांकाचे महाविद्यालय होण्याचा मान मिळाला. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, कला व क्रीडा, आदी क्षेत्रांत ‘केआयटी’ने आपला ठसा उमटविला आहे.
प्रश्न : विद्यार्थ्यांसाठी नवीन काय केले?
उत्तर : देशातील उद्योगांना लागणारे अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्यांची सुरुवात ‘केआयटी’ने केली आहे. अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षात औद्योगिक क्षेत्राकडून होत असलेल्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या निर्मितीमध्ये दरी आहे. ती भरून काढण्यासाठी कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात. सध्या परीक्षा सत्र पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राच्या तयारीसाठी कमी वेळ मिळतो. त्यांची परीक्षेची तयारी पक्की करून घेण्यासाठी जसे-जसे चॅप्टर होतील, तशी चाचणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो; शिवाय परीक्षेची तयारी देखील होते. उद्योजकांनी सुरू केलेले कॉलेज असल्याने प्लेसमेंटचे प्रमाण चांगले आहे. एम्प्लॉईबल इंजिनिअर तयार करण्याचे काम ‘केआयटी’ करते. तसेच सेमिनार, मॉडेल प्रीपरेशनद्वारे विद्यार्थ्यांमधील अंतर्गत ‘टॅलेंट’ला संधी दिली जाते.
प्रश्न : भविष्यातील नियोजन काय आहे?
उत्तर : राज्यात ‘केआयटी’चे चांगले नाव आहे. ते देशभरात पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आणि आॅटोनॉमी मिळविण्याला प्राधान्य राहील. देशातील प्रमुख इंडस्ट्रीज, कंपन्यांसमवेत थेट संवाद साधून अभ्यासक्रमांची रचना, स्वरूप निश्चित केले जाणार आहे. त्यासह कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यावर भर राहणार आहे. टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या दिशेने कामकाज केले जाणार आहे. ‘ई-लायब्ररी’, जर्नल्स्ची सुरुवात केली जाईल. तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देऊन भविष्यातील अभ्यासक्रमांबाबत तयार केले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणारे ‘रिसर्च हब’ म्हणून ‘केआयटी’चा विकास केला जाणार आहे. चांगले प्रवेश, निकाल आणि प्लेसमेंट या त्रिसूत्रीने कार्यरत राहून ‘केआयटी’ला सक्षम केले जाईल. काळाची गरज ओळखून नवे अभ्यासक्रम सुरू केले जातील. औद्योगिक क्षेत्राशी जवळीकता साधून अभ्यासक्रम, मनुष्यबळ निर्मितीची आमची तयारी आहे. त्यासाठी स्वायत्तता मिळविण्याचे आता आमचे ध्येय आहे. त्यातील पहिला टप्पा या मूल्यांकनाद्वारे पूर्ण केला. त्यानंतरची कायमस्वरूपी संलग्नतेची पात्रता पूर्ण केली असून, शिवाजी विद्यापीठाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. आमच्याकडे येणारे विद्यार्थी उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह त्यांची रोजगारभिमुखता, औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार मनुष्यबळ निर्मिती करण्यावर भर राहणार आहे.
- संतोष मिठारी