श्रावण सोमवारनिमित्त सजली महादेव मंदिरे
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:11:06+5:302014-07-28T00:13:23+5:30
शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई : विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रावण सोमवारनिमित्त सजली महादेव मंदिरे
करवीरनगरीत सुमारे तीनशेहून अधिक शंकरांची मंदिरे आहेत. त्यामध्ये बऱ्याच मंदिरांचा ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथात उल्लेख आहे; परंतु काही नव्याने त्या जुन्या मंदिरांच्या प्रतिकृती उभ्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ कावळा नाका परिसरातील वटेश्वर महादेव मंदिर हे होय. श्रावण सोमवारनिमित्त पहाटे तीन वाजता लघुरुद्राभिषेक, आरती, त्यानंतर भक्तांना बुंदी वाटप व रात्री साडेसात वाजता भजन होणार असल्याचे पुजाऱ्यांनी यावेळी सांगितले.
पद्माळ्याच्या काठावर श्री नरसिंह, कात्यायनीजवळ परशुराम आणि गोकुळ शिरगाव क्षेत्री श्रीकृष्ण अशा या अवतार परंपरेत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रानी आपल्या पदस्पर्शांने पावन केलेले क्षेत्र म्हणजे श्रीरावणेश्वर मंदिर. मंदिरात पहाटे रुद्र एकादशीने सुरुवात होऊन भक्तांना दूध वाटप करण्यात येईल. दुपारी चार ते सहा यावेळेत प्रवचनकार प्रसन्न मालेकर यांचे ‘महादेव महिमा’ या विषयावर प्रवचन होणार आहे. सायंकाळी वडणगेतील प्रल्हाद पाटील, विक्रम पाटील यांचे भावगीत, भक्तिगीत सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक शशिकांत मुछंडी यांनी सांगितले.
पुरातन काळातील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. श्रावण सोमवारी पहाटे अभिषेक, मंत्रपठण व रात्री उत्तरेश्वर प्रासादिक महादेव भजनी मंडळाचे भजन रात्री दहा वाजता होणार आहे. तिसऱ्या सोमवारी महापूजा व सत्यनारायण पूजा पहाटे होणार आहे.
कपिलतीर्थ मार्केटमधील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराची ग्रामदैवत म्हणून तसेच पुरातन मंदिर म्हणून ओळख आहे. या मंदिर परिसरात पूर्वी पाण्याचे तळे होते. १६६४ मधील हे मंदिर आहे. आठ पिढ्यांपासून या मंदिराची वहिवाट धर्माधिकारी कुटुंबीयांकडे आहे. श्रावणनिमित्त मंदिरात अभिषेक होईल, असे मंदिराचे पुजारी गिरिजा धर्माधिकारी यांनी सांगितले.