‘सागर’ला हवाय मदतीचा हात

By Admin | Updated: July 31, 2014 23:29 IST2014-07-31T22:11:17+5:302014-07-31T23:29:04+5:30

लहानपणीच अनाथ; मेकॅनिकल डिप्लोमासाठी घ्यावयाचाय प्रवेश

'Sagar' needs help | ‘सागर’ला हवाय मदतीचा हात

‘सागर’ला हवाय मदतीचा हात

कोल्हापूर : आई-वडिलांचा पत्ता नाही, स्वत:चे मूळ नाव माहीत नाही, अशा परिस्थितीत वयाच्या ६ व्या वर्षी हरवलेला, अशी नोंद झालेल्या सागर शहाजी वीर याने जीवनातील अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जात शालेय शिक्षणाचा प्रवास उत्तुंगपणे पार पडला. आता आयुष्यातील करिअरच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण वळणावर तो आला आहे. त्याला ‘डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग’च्या प्रवेशासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अनाथपणा पुसून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या सागरला समाजातील दानशूरांनी हात देणे गरजेचे आहे.
‘हरवलेला’ अशी नोंद असलेल्या सागरला एक नाव आणि आडनांव देवून ‘अनाथ’असा उल्लेख केलेल्या दाखल्यासह मुंबईतील पोलिसांनी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जगदाळे बालगृहात दाखल केले. येथील स्वामी समर्थ विद्यालयात त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सुटीच्या वेळेत केटरिंगमध्ये वाढपी तसेच अन्य लहान-सहान कामे करून त्याने आपला शैक्षणिक खर्च भागविला. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला कोल्हापुरातील शासकीय पुरुष राज्यगृहात पाठविण्यात आले. २०१३ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ८२ टक्के गुण मिळविले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण घेऊन सन्मानाने जगायचे हे स्वप्न बाळगलेल्या सागरने मुक्त विद्यापीठाच्या डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. यावेळी प्रात्यक्षिकांसाठी काही कंपनीमध्ये काम करताना त्याला शारीरिक त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला हे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. प्रकृती ठीक झाल्यामुळे आता डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ३९ हजार रुपये आहे. त्याची शिक्षणाबाबतची धडपड आणि परिस्थिती पाहून या कॉलेजमधील काही प्राध्यापकांनी त्याला मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेल्या मदतीवर सागरने शुल्कातील काही रक्कम भरली आहे. उर्वरित रकमेसाठी त्याला आणखी मदतीची गरज आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण घेवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या सागरला दानशूरांनी मदतीचा हात दिल्यास त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sagar' needs help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.