पोटाच्या खळगीने दाखविली ऊसतोडीची वाट !

By Admin | Updated: November 21, 2015 00:16 IST2015-11-20T20:44:11+5:302015-11-21T00:16:07+5:30

अल्पवयीन ऊसतोड कामगार : गगनाला भिडणाऱ्या महागाईत अनेक समस्यामुळेच पेनऐवजी हातात कोयता

Saddle room with abdominal stomach! | पोटाच्या खळगीने दाखविली ऊसतोडीची वाट !

पोटाच्या खळगीने दाखविली ऊसतोडीची वाट !

दत्तात्रय पाटील- म्हाकवे --उद्या मी डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर होऊन मोठा पगार घेईन, समाजात माझे नावही होईल, गाडी, बंगलाही असेल; पण पोटाच्या खळग्यात आज अन्नाचे कण गेले, तरच या स्वप्नांना पंख मिळेल. मग तुम्हीच सांगा, आजच्या पोटापाण्याची व्यवस्था कुठून करायची? हाता-तोंडाची गाठभेट होणे मुश्कील असताना गगनाला भिडणाऱ्या महागाईत शिक्षणाचा ‘शिवधनुष्य’ पेलायचा कसा, अशा एक ना अनेक समस्यामुळेच पेनऐवजी हातात कोयते घेऊन ऊसतोडणीची पायवाट तुडवावी लागत आहे, अशी दिनवाणी व्यथा अल्पवयीन ऊसतोड मजुरांकडून उसाच्या फडात ऐकायला मिळत आहे.
ऊसदराच्या आंदोलनासह ऊसतोड मजुरांचे दरवाढ, मजुरीवाढ यासाठी असणारे आंदोलन निवळले आहे. त्यामुळे बीड, परभणी, जालना, आदी विदर्भ-मराठवाड्यासह कर्नाटकातील ऊसतोड मजुरांचे तांडे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
या ऊसतोड मजुरांसोबत लहान-सहान मुलेही आली आहेत, तर अनेक टोळ्यांमध्ये अल्पवयीन, मधेच शाळा सोडलेले, तर शाळेची पायरीच चढलेले नाही अशा मजुरांचा समावेश आहे. त्यामुळे सक्तीचे प्राथमिक शिक्षण, बालमजुरी रोखणारा कायदा पोटासाठी आलेल्या या अल्पवयीन मुलांच्या दृष्टीने कुचकामी, केवळ कागदावरच राहणार आहे.
सध्या प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले आहे. तसेच गरीब मुलांना गणवेश, मध्यान्ह भोजनही दिले जाते. तरीही ऊसतोड मजुरांच्या मुलांचे मन शाळेत का रमत नाही, याबाबत अधिक खोलात जाऊन माहिती घेतली असता असे दिसून आले की, शिक्षण मोफत मिळेल, दुपारचे थोडेफार जेवणही मिळेल; पण सकाळ आणि सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था कोठून करायची. तसेच काही अल्पवयीन मुलांवर तर लहान भावंडांसह वयोवृद्ध आई-वडिलांचीही जबाबदारी असते. त्यामुळे या मुलांना ऊसतोड केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे ही मुले उज्ज्वल भविष्याचा विचार करतील कशी? हा सर्वांनाच अनुत्तरीय करणारा प्रश्न आहे. त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. गरिबी, शैक्षणिक अंधकार आ वासून उभा असताना देशाने महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणे कितपत योग्य आहे, याचेही आत्मपरीक्षण झालेलेच बरे.

Web Title: Saddle room with abdominal stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.