सदानंद, रामराजे की पाटील ?

By Admin | Updated: April 8, 2015 00:32 IST2015-04-07T20:15:17+5:302015-04-08T00:32:38+5:30

‘गोकुळ’चे रणांगण : ‘गडहिंग्लज’च्या उमेदवारीवरून सत्तारूढ नेतेमंडळींसमोर पेच

Sadanand, Ramraje's Patil? | सदानंद, रामराजे की पाटील ?

सदानंद, रामराजे की पाटील ?

राम मगदूम -गडहिंग्लज ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दिवंगत ज्येष्ठ संचालक राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद, स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे रामराजे की, जुने सहकारी बाळासाहेब पाटील यापैकी कुणाला उमेदवारी द्यावी, या पेचात सत्तारूढ आघाडीची नेतेमंडळी सापडली आहेत.आमदार महादेवराव महाडिक यांचे विश्वासू सहकारी व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी यांचे गेल्यावर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सदानंद यांना ‘स्वीकृत’ करून घ्यावे, यासाठी हत्तरकीप्रेमींनी प्रयत्न केले. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळेच सत्तारूढ पॅनेलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यावेळी झालेल्या कुपेकर घराण्यातील गृहकलहात केवळ रामराजेच संध्यादेवींच्या पाठीशी राहिले. त्यांना संधी देण्याची ‘संधी’ ‘गोकुळ’च्या निमित्ताने आता आली आहे. त्यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक व आमदार कुपेकर यांनीही आग्रह धरला आहे.
दोन दशकापूर्वीच्या निवडणुकीत तत्कालीन विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील-औरनाळकर यांना ऐनवेळी डावलून हत्तरकींना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांची ‘गोकुळ’मधील यापूर्वीची कामगिरी, उच्चविद्याविभूषित व अनुभवी सहकारी म्हणून त्यांना पुन्हा संधी द्यावी, असा मतप्रवाह जुन्या संचालकांत आहे. काही ठरावधारकांनीदेखील नेत्यांना समक्ष भेटून त्यांच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. या पार्श्वभूमीवर स्व. हत्तरकींचा वारस म्हणून सदानंद यांना संधी द्यावी, संध्यादेवींच्या निवडणुकीतील योगदानाची दखल आणि कुपेकर घराण्याशी असणारे नातेसंबंध विचारात घेऊन रामराजेंना संधी द्यावी की, जुने ऋणानुबंध आणि ज्येष्ठ सहकारी म्हणून औरनाळकर-पाटलांना उमेदवारी देऊन त्यांच्यावरील अन्यायाचे ‘परिमार्जन’ करावे की, बदललेल्या परिस्थितीत नव्या चेहऱ्याची निवड करावी, या ‘धर्मसंकटात’ आमदार महाडिक सापडले आहेत. त्यामुळेच ‘गडहिंग्लज’च्या उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sadanand, Ramraje's Patil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.