पाचशेहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे एस. टी.ने थकवले सव्वाआठ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:17+5:302021-08-01T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने गेल्या दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे ८ ...

पाचशेहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे एस. टी.ने थकवले सव्वाआठ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने गेल्या दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे ८ कोटी ३० रुपये थकवले आहेत. यात शिल्लक रजेचा पगार व वेतनवाढीतील फरक यांचा समावेश आहे. सेवानिवृत्त कर्मचारी फेब्रुवारी २०१९पासून आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून झगडत आहेत.
एस. टी. महामंडळातून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला एक महिन्यात भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युइटी दिले जाते. मात्र, त्यासोबतच कर्मचारी निवृत्त होताना त्याचा रजेचा शिल्लक पगार व वेतनवाढीतील फरक देणेदेखील क्रमाप्राप्त आहे. मात्र, फेब्रुवारी २०१९नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची महामंडळाने गंगाजळीत ठणठणाट असल्यामुळे ही रक्कम थकवली आहे. कोल्हापूर विभागातून सुमारे ५००हून अधिक कर्मचारी या दोन वर्षांच्या कालावधीत निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांना ही देणी काही केल्या अजूनही मिळालेली नाहीत.
केवळ वाट पाहणेच निशिबी
कोल्हापूर विभागातून ५००हून अधिक कर्मचारी फेब्रुवारी २०१९पासून निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर दिला जाईल, असे महामंडळाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नशिबी सध्यातरी ही रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
प्रतिक्रिया
मी मे २०२०मध्ये सेवानिवृृत झालो असून, माझा शिल्लक रजा व वेतनवाढीतील फरक अजूनही मिळालेला नाही. तुटपुंज्या निवृ्तीवेतनावर जगणे असहाय्य झाले आहे. महामंडळाच्या प्रशासनाने दखल घेऊन ही रक्कम लवकर द्यावी.
- मियालाल पटवेगार, सेवानिवृत्त चालक, इचलकरंजी आगार
प्रतिक्रिया
मी वाहतूक नियंत्रक म्हणून ऑक्टोबर २०२०मध्ये सेवानिवृत्त झालो. मात्र, अद्यापही मला शिल्लक रजा व वेतनातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- बी. डी. शिंदे , सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक
कोट
महामंडळाची अर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तुटपुंजे निवृत्तीवेतन आहे. वेतन करारातील फरकाची रक्कम आणि शिल्लक रजा ही रक्कम मिळाली तर दिलासा मिळेल. शासनाने लक्ष घालून महामंडळाला भरीव मदत मिळावी, याकरिता संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.
- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस, कोल्हापूर
कोट
महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन तुटपुंजी आहे. त्यामुळे शिल्लक रजा व वेतन करारातील फरकाची रक्कम लवकरात लवकर देऊन दिलासा द्यावा. त्यादृष्टीने संघटना प्रयत्नशील आहे.
- उत्तम पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, कोल्हापूर
जिल्ह्यात आगार - १२
अधिकारी - ४६
वाहक - १४२५
चालक - १४५०
यांत्रिकी - ९२४
चालक-वाहक - ३४