एस. के. पाटील महाविद्यालय परिसरातील झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:27+5:302021-01-17T04:21:27+5:30
कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील महाविद्यालय परिसरातील सुमारे आठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे ...

एस. के. पाटील महाविद्यालय परिसरातील झाडांची कत्तल
कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील महाविद्यालय परिसरातील सुमारे आठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाल्याने शहरवासीयातून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान वन विभागाचे अधिकारी गजानन सकट यांनी तोडलेल्या झाडांचा पंचनामा करण्यासाठी शनिवारी आल्याने महाविद्यालय प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यांच्याकडून सबळ कारण न मिळाल्याने तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी सकट यांनी दिली. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
येथील एस. के. पाटील महाविद्यलयाच्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची मोठी झाडे होती. या झाडांमुळे सावलीबरोबरच महाविद्यालयाला सौंदर्य प्राप्त झाले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी आठ मोठ्या झाडांची कत्तल केल्याने महाविद्यालय परिसर झाडांअभावी भकास दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांबरोबर शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झाडांची कत्तल केल्याचे समजताच वन विभागाचे पथक शनिवारी दुपारी दाखल झाले. तोडलेल्या झाडांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यामुळे झाडांची कत्तल कोणी केली, त्याच्यावर कोणती कारवाई होणार, याची उत्सुकता शहरवासीयांना लागून राहिली आहे.
फोटो - १६०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील एस. के. पाटील महाविद्यालय परिसरातील कत्तल केलेल्या झाडांचा वन विभागाचे अधिकारी गजानन सकट यांनी पंचनामा केला.