एस. चैतन्य कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक
By Admin | Updated: May 14, 2015 01:09 IST2015-05-14T01:09:06+5:302015-05-14T01:09:50+5:30
अंकित गोयल वर्ध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक

एस. चैतन्य कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक
कोल्हापूर : कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी, तर इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्य यांची कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीने बढती झाली.
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाच्या मंजुरीनंतर बुधवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूरचे अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी तर इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्य यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. गोयल यांचे मूळ गाव इंदोर (मध्यप्रदेश) ते बी. ई. इलेक्ट्रॉनिक असून, २०१० मध्ये ते पोलीस दलामध्ये रूजू झाले. २०१२ मध्ये त्यांची अमरावतीमधील चांदूर रेल्वे सहाय्यक पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पदोन्नतीने कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी कोल्हापूरचा पदभार स्वीकारला. त्यांनी एक वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का व हद्दपार अशा गंभीर स्वरुपाच्या कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले. गणेशोत्सव, टोल आंदोलन त्यांनी चांगल्याप्रकारे हाताळली. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. या तपासात त्यांनी २४ तास झोकून देत मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य हे दोन वर्षांपूर्वी नांदेडहून कोल्हापुरात आले. त्यानंतर इचलकरंजी विभागातील गुन्हेगारांना ‘सळो की पळो’ करून सोडले. अवैध व्यावसायिकांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. त्यांनी अत्यंत कमी वयात चांगले काम करून दाखविले. गोयल यांच्याकडील पानसरे हत्येचा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी
‘कोल्हापूरमध्ये काम करताना शिकायला खूप मिळाले. येथील सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीची चांगली ओळख झाली. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये चांगले काम करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
- अंकित गोयल,
अप्पर पोलीस अधीक्षक